ऋतुराजची पत्नीच नाही तर एक 'क्रिकेटर', उत्कर्षा पवारने सांगितला 'प्रवास', वाचा सविस्तर

भारतीय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडने महाराष्ट्राची क्रिकेटपटू उत्कर्षा पवारसोबत विवाहगाठ बांधली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 02:23 PM2023-08-05T14:23:41+5:302023-08-05T16:10:14+5:30

whatsapp join usJoin us
 Indian cricketer Ruturaj Gaikwad's wife Utkarsha Pawar is a fast bowler in Maharashtra women's team  | ऋतुराजची पत्नीच नाही तर एक 'क्रिकेटर', उत्कर्षा पवारने सांगितला 'प्रवास', वाचा सविस्तर

ऋतुराजची पत्नीच नाही तर एक 'क्रिकेटर', उत्कर्षा पवारने सांगितला 'प्रवास', वाचा सविस्तर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : क्रिकेपटूलाच आपल्या आयुष्याचा जोडीदार बनवणाऱ्या क्रिकेटपटूंची संख्या मोजकीच आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची पत्नी ॲलिसा ही देखील एक स्टार क्रिकेटर असून ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. आता या यादीत एका मराठमोळ्या जोडीची देखील भर पडली असून ऋतुराज गायकवाडनेमहाराष्ट्राची क्रिकेटपटू उत्कर्षा पवारसोबत विवाहगाठ बांधली आहे. अलीकडेच हे दोघे विवाहबंधनात अडकले. एका नामांकित खेळाडूशी विवाह केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या उत्कर्षाला क्रिकेटपटूची पत्नी नाही तर क्रिकेटपटू म्हणून ओळख बनवायची आहे. 

उत्कर्षाने आपल्या क्रिकेटच्या प्रवासाबद्दल आणि भविष्याबद्दल बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. क्रिकेटचा प्रवास मांडताना तिने म्हटले, "माझे बाबा क्रिकेट खेळायचे ते शिकवायला जायचे त्यामुळे इथूनच माझ्या क्रिकेटची सुरूवात झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मी ७-८ वर्षांची असताना तेव्हापासून ते मला मैदानावर खेळायला घेऊन जात असत. बाबांच्या या सवयीने मला क्रिकेटकडे नेले अन् तेव्हापासूनच मी क्रिकेट खेळायला सुरूवात केली. स्विमिंग, फुटबॉल यांसारख्या बऱ्याच खेळात मला घरच्यांनी आजमावून पाहिलं. पण, माझा क्रिकेटमध्येच रस असल्याचे मी घरच्यांना सांगितले. लहानपणी मी खूप कमजोर होती कारण दर दहा दिवसाला आजारी पडायची. परंतु, आता क्रिकेटने एवढं आपलंस केलंय की तो प्रवास खूप चांगला आणि मोठा होता, जो शब्दांत मांडणे कठीण होईल."

'क्रिकेट'मय उत्कर्षा
भारतीय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडची पत्नी सध्या वेस्ट इंडिजमध्ये असून ती CCBKला दिलेल्या खास मुलाखतीत बोलत होती. क्रिकेटशिवाय इतर कोणत्या क्षेत्राची आवड आहे का? असे विचारले असताना उत्कर्षाने सांगितले की, तिने चार वर्ष कथ शिकले आहे, आठवड्यातून तीन दिवस ती कथक शिकायला जायची असे ती सांगते. पण, शाळेतील स्पर्धा सुरू असताना घडलेल्या एका प्रसंगाने उत्कर्षाला डान्सपासून दूर नेले. "पाचवीपर्यंतच्या ॲथलेटीक्स स्पर्धा सुरू असताना खेळताना मला खरचटले होते. हे पाहिल्यावर माझी गुरू अर्थात ताई तिने आईला सांगितलं की, तिला कुठेही खेळायला पाठवू नका. नाहीतर हिच्यातला नाजूकपणा जाईल... पण, मी त्याच्या दुसऱ्याच दिवशी सांगितलं की आता डान्स करणार नाही. तेव्हापासून डान्स हे प्रकरण बाजूला गेलं पण मला आजही डान्स करायला आवडते", असे उत्कर्षाने सांगितले.

गोलंदाजीकडे कशी वळली? 
उत्कर्षा पवार ही एक मध्यमगती गोलंदाज असून तिने महाराष्ट्राकडून खेळताना आपली क्षमता दाखवून दिली आहे. गोलंदाजी क्षेत्राकडे कशी वळली याबाबत तिने म्हटले, "माझे पहिले प्रशिक्षक माझे बाबाच होते. कारण ते एक कॅम्प चालवायचे. बाबांसोबतच सराव केल्याने तेच माझे पहिले गुरू होते. लहानपणी फिरकी गोलंदाजी असलं काही कळायचं नाही पण चेंडू जोरात टाकायचा एवढंच मला समजत होतं. मग झहीर खानप्रमाणे मी गोलंदाजी करायला सुरूवात केली. बाबांनी विचारले असता सांगितले की, झहीर खानसारखे पळायचे आहे, मग त्यांनी मला गोलंदाजीच्या प्रशिक्षणासाठी अन्वय सरांकडे नेले."  

पदार्पणाच्या सामन्यातील आठवणी सांगताना उत्कर्षा म्हणाली की, मुंबईमध्ये सौराष्ट्रविरूद्धच्या सामन्यातून महाराष्ट्रासाठी पदार्पण केले. तो सामना पावसामुळे २५ षटकांचा खेळवला गेला. आम्ही नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर बळी घेण्यात यश आले होते. माझी आई देखील तो सामना पाहायला आली होती. अंडर-१९ पासून आजपर्यंत आईने माझा एकही सामना पाहण्यासाठी कंटाळा केला नाही. 

उत्कर्षाची विक्रमी कामगिरी 
खरं तर सात धावा देऊन पाच बळी घेण्याचा विक्रम देखील उत्कर्षाच्या नावे आहे. सात धावा देऊन पाच बळी घेणं ही एक अविस्मरणीय कामगिरी असल्याचे ती सांगते. राज्यस्तरावर अशी किमया साधणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. कधी कधी चांगली गोलंदाजी करून देखील बळी मिळत नाही. पण पाच बळी घेतले तेव्हा मी चांगली गोलंदाजी केली होती, असेही तिने नमूद केले. 

२०२३-२४ चं टार्गेट काय? 
सातत्याने चांगली कामगिरी करून महाराष्ट्राला जिंकवून देणे यावर मी लक्ष केंद्रीत करत आहे. रोहित पवारांनी सांगितल्याप्रमाणे, पुढच्या वर्षीपासून महिला महाराष्ट्र प्रीमिअर लीगची सुरूवात होत आहे, यामुळे सर्वांना संधी मिळणार आहे, जिथे सर्व खेळाडू स्वत:ला सिद्ध करू शकतात. तसेच महिला प्रीमिअर लीगमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहे, असे तिने आणखी सांगितले. 

धोनीचे तोंडभरून कौतुक 
आयपीएलचा सोळावा हंगाम चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने जिंकल्यानंतर उत्कर्षाने आपला पती ऋतुराजसोबत भारतीय दिग्गज महेंद्रसिंग धोनीची भेट घेतली होती. याबद्दल बोलताना तिने सांगितले की, धोनी खूप साधा माणूस असून त्याला कशाचाही गर्व नाही. एवढा मोठा खेळाडू असताना देखील तो सगळ्यांशी साधेपणाने वागतो. चेन्नईच्या संघामध्ये धोनीने कुटुंबासारखे वातावरण ठेवले आहे. झहीर खान आणि जॅक कॅलिस हे माझे क्रिकेटमधील आदर्श आहेत. लग्नानंतर बाहेरचे काही लोक विचारतात की, आता तू क्रिकेट खेळणार का? त्यांना मी एवढेच सांगेन की, माझे शरीर जोपर्यंत साथ देईल तोपर्यंत १०० काय २०० टक्के मी क्रिकेट खेळत राहीन. 

 

Web Title:  Indian cricketer Ruturaj Gaikwad's wife Utkarsha Pawar is a fast bowler in Maharashtra women's team 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.