भारताचा सलामीवीर शिखर धवन याने १४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर भारतीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ३८ वर्षीय क्रिकेटरनं आंतरारष्ट्रीय क्रिकेटसह देशांतर्गत क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे. क्रिकेट जगतात 'गब्बर' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या डावखुऱ्या फलंदाजानं आपल्या कारकिर्दीत 'एक से बढकर एक' खेळी करून दाखवली आहे. त्याच्या नावे काही खास रेकॉर्ड आहेत जे भारतीय क्रिकेट चाहते कधीच विसरणार नाही. इथं एक नजर टाकुयात त्याच्या पाच खास विक्रमांवर
पदार्पणाच्या टेस्टमध्ये फास्टर सेंच्युरी
शिखर धवन याने आपला पहिला कसोटी सामना १४ मार्च २०१३ रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. मोहालीच्या मैदानात डावाची सुरुवात करताना त्याने ८५ चेंडूत शतक झळकावले होते. या खेळीसह पदार्पणाच्या कसोटीत जलद शतकी खेळी करण्याचा रेकॉर्ड त्याने आपल्या नावे केला होता. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आजही कायम आहे. मोहाली कसोटीत त्याने १७४ चेंडूत १८७ धावांची खेळी केली होती.
वनडेत सर्वात जलद ३ हजारी गाठणारा भारतीय
तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण भारताकडून वडेत सर्वात जलद २००० आणि ३००० धावांचा टप्पा पार करण्याचा विक्रमही शिखर धवनच्या नावे आहे. त्याने १६७ वनडे सामन्यात ४४.११ च्या सरासरीनं १७ शतके आणि ३९ अर्धशतकांसह त्याच्या खात्यात ७४६३ धावांची नोंद आहे.
भारतीय संघाकडून १०० सामने खेळणं कोणत्याही खेळाडूसाठी मोठी गोष्ट असते. धवनला टेस्ट आणि टी-२० मध्ये ते जमलं नाही. पण वनडेत त्याने हा पल्ला गाठला. एवढेच नाही तर शंभराव्या वनडेत त्याने शतकी खेळीही केली होती. शतकी सामन्यात शंभरी साजरी करणारा तो भारताचा एकमेव फलंदाज आहे.
मिनी वर्ल्डकपमधील चॅम्पियन खेळाडू
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत शिखर धवनची कामगिरी अविस्मरणीय राहिली आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो गेल (१७ सामन्यात ७९१) आणि जयवर्धने (२२ सामन्यात ७४२) यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर आहे. पण धवनने फक्त १० सामन्यात ७०१ धावा करुन दाखवल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सलग दोन वेळा गोल्डन बॅट जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे.
IPL मध्ये चौकारांचा बादशाह
आयपीएलमध्येही धवनने आपली जादू दाखवून दिली आहे. भारताच नाही तर जगात लोकप्रिय असलेल्या या लीगमध्ये धवनने २२२ सामन्यातील २२१ डावात ७६८ चौकार मारले आहेत. सर्वाधिक चौकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो टॉपला आहे.
सलग दोन शतकांचा रेकॉर्ड
आयपीएल स्पर्धेत शिखर धवन वेगवेगळ्या फ्रँचायझी संघाकडून खेळताना दिसला आहे. सर्वाधिक चौकारांशिवाय या स्पर्धेत सलग दोन शतके झळकवण्याचा विक्रमही त्याच्या नावे आहे.
Web Title: Indian Cricketer Shikhar dhawan 5 Big Records Always Remember Him After Retires From International And Domestic Cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.