ठळक मुद्देमुंबईत क्रिकेट खेळण्यासाठी तो थेट पालघरहून रेल्वेने यायचा. त्यावेळी तू प्रवासात एवढा वेळ घालवतोस, तर तू कसा चांगला क्रिकेटपटू होशील?
मुंबईः आंतरराष्ट्रीय स्तरावरचा क्रिकेटपटू, ज्याने आयपीएलमध्येही प्रसिद्धी मिळवली आहे, जर तो तुम्हाला मुंबईच्या रेल्वेच्या डब्यातून प्रवास करताना दिसला, तर.... ही गोष्ट धक्कादायक असली तरी ती तेवढीच खरी देखील आहे. आयपीएलमधील ग्लॅमरमुळे क्रिकेटपटूंचे पाय जमिनीवर राहीले नाहीत, अशी टीका होताना आपण ऐकतो, पण या टीकेला तो अपवाद ठरला आहे. सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेट संघातील एक खेळाडू अजूनही मुंबईतील रेल्वेने प्रवास करतो आहे. रेल्वेमधून प्रवास केल्यावर पाय जमिनीवर राहतात, असे त्या खेळाडूचे म्हणणे आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगला लौकिक मिळवल्यानंतर सचिन तेंडुलकर एकदा रिक्षाने विमानतळावर पोहोचला होता, तेव्हा बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण या क्रिकेटपटूला तर लहानपणापासूनच रेल्वेच्या प्रवासाची सवय आहे. मुंबईत क्रिकेट खेळण्यासाठी तो थेट पालघरहून रेल्वेने यायचा. त्यावेळी तू प्रवासात एवढा वेळ घालवतोस, तर तू कसा चांगला क्रिकेटपटू होशील? असे प्रश्न बऱ्याच जणांनी विचारले होते. पण या सर्व प्रश्नांना त्याने आपल्या कामगिरीतूनच उत्तर दिले आणि आता तर त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमक दाखवायला सुरुवात केली आहे. तो खेळाडू आहे वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर.
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातही या खेळाडूने दमदार कामगिरी केली होती. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून भारतात येताना तो बिझनेस क्लासमधून मुंबईच्या विमानतळावर उतरला. तिथून त्याने थेट अंधेरी स्थानक गाठलं. अंधेरी स्थानकातील तिकीट खिडकीवर तो गेला. तिथून त्याने पालघरसाठीचे प्रथम दर्जाचे तिकीट काढले. लोकल पकडली. लोकलच्या डब्यामध्ये तो जेव्हा शिरला तेव्हापासून बरीच जण त्याला पाहत होती.
रेल्वेच्या प्रवासाची मला लहानपणापासून सवय आहे. आणि मला लोकलमधून प्रवास करताना चांगलंही वाटतं. आता जेव्हा मी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून थेट लोकलच्या डब्यात चढलो, तेव्हा काही जणांना मी शार्दुल असल्याचे वाटतही नव्हते. काही जणांनी गुगलमध्ये जाऊन माझे फोटो बघितले आणि त्यानंतर त्यांनी माझ्याशी संवाद साधायला सुरुवात केली. मी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असलो तरी लोकलमधून प्रसाव करण्याचा कमीपणा मला वाटत नाही, असे शार्दुल यावेळी सांगत होता.
Web Title: The Indian cricketer is still doing the train journey by rail
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.