मुंबई : श्रीलंकेतील निदाहास ट्रॉफीमध्ये भारताने जेतेपद पटकावले. भारतीय क्रिकेटपटूंच्या मेहनतीला चांगले फळ मिळाले. पण काही भारतीय क्रिकेटपटू मेहनत करून एवढे दमले होते की, भारतात परतत असताना दोन क्रिकेपटू विमानामध्ये चादर ओढून झोपले होते. पण फक्त एवढ्यावर ते थांबले नाहीत तर ते चांगलेच घोरतही होते. संघातील फिरकीपटू युजवेंद्र चहलने ही गोष्ट सर्वांपुढे आणली आहे.
अंतिम सामन्यात अखेरच्या दोन षटकात विजयासाठी 34 धावांची गरज असताना दिनेश कार्तिकने केवळ 8 चेंडूत नाबाद 29 धावांचा तडाखा देत भारताला बांगलादेशविरुद्ध चार गडी राखून थरारक विजय मिळवून दिला. यासह प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये टी20 तिरंगी मालिकेत सहभागी झालेल्या युवा भारतीय संघाने दिमाखदार जेतेपद उंचावले. दिनेश कार्तिकने केलेल्या धमाकेदार खेळीच्या बळावर भारताने निदाहास चषक पटकावला होता.
जेतेपद पटकावल्यानंतर भारतीय संघाने भारतात येण्यासाठी विमान गाठले. सारेच खेळाडू थकलेले होते. पण हे दोन खेळाडू एवढे थकले होते की, झोपल्यावर ते घोरत होते. हे दोन क्रिकेटपटू म्हणजे भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना आणि दुसरा होता युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत. या दोघांची पोलखोल चहलने केली आहे. आपल्या इंस्टाग्रॅमच्या अकाऊंटवर चहलने हा फोटो टाकला आहे. रैना आणि पंत यांचा चेहरा यांचा एवढा सारखा दिसतो की लोकांना ते दोघे भाऊच आहेत, असेही वाटते.
निदाहास ट्रॉफीमध्ये रैनाने पाच सामन्यांमध्ये 132.05च्या स्ट्राइक रेटने 103 धावा केल्या आहेत. पंतने दोन सामन्यांत पंधराच्या सरासरीने 30 धावा केल्या होत्या.