लंडन : भारतीय क्रिकेट आणि बॉलीवूड यांचे चांगलेच कनेक्शन आहे. आता तर 'रेस 4'मध्ये भारताच्या वर्ल्डकप संघातील एक खेळाडू पाहायला मिळणार असल्याचे समजते आहे. कारण भारताचा सलामीवीर रोहित शर्मानेच असे संकेत दिले आहेत.
लंडनहून भारतीय संघ कार्डिफला जात होता. तेव्हा बसमधून प्रवास करताना रोहित शर्माने एक व्हिडीओ बनवला आणि तो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये रोहितने याबाबत खुलासा केल्याचे पाहायला मिळते.
या व्हिडीओच्या सुरुवातीला रोहितने रवींद्र जडेजाचे कौतुक केले आहे. जडेजाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात अर्धशतकी खेळी साकारली होती. त्यामुळेच भाराताला प्रथम फलंदाजी करताना 179 धावा करता आल्या होत्या. त्यामुळे रोहितने पहिल्यांदा या व्हिडीओमध्ये जडेजाचे कौतुक केले आहे.
यावेळी जडेजाच्या बाजूला केदार जाधव बसला होता. त्यावेळी रोहितने केदारला याबाबत विचारणा केली. रोहित म्हणाला की, " आता आपल्याबरोबर आहेत 'रेस 4'मधील अॅक्टर केदार जाधव. आम्हाला असे समजले आहे की, तुला 'रेस 4'ची ऑफर आली आहे."
रोहितच्या प्रश्नावर केदार म्हणाला की, " अजूनपर्यंत कोणत्याच गोष्टी कन्फर्म झालेल्या नाहीत, पण तुमच्यासाठी एक सरप्राईज नक्कीच असेल."
भारताचा चौथ्या क्रमांकाचा तिढा कायम
भारतीय संघाचा चौथ्या क्रमांकाचा तिढा अजूनही सुटलेला दिसत नाही. वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. आज भारताचा न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना सुरु आहे. या सराव सामन्यात लोकेश राहुलला चौथ्या स्थानावर फलंदाजीला पाठवले होते. पण राहुलला फक्त सहाच धावा करता आल्या. त्यामुळे भारताचा चौथ्या क्रमांकाचा तिढा कायम असल्याचे म्हटले जात आहे.