भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल सध्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळे चर्चेत आहे. युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात बिनसलं असून दोघांनी घटस्फोट घेण्याचा टोकाचा निर्णय घेतलाय, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. एका बाजूला सोशल मीडियावर हे कपल विभक्त होणार असल्याची चर्चा रंगत असताना इन्स्टाग्रामवरून दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याची गोष्ट चर्चेत आली. त्यात आता युजवेंद्र चहलच्या नवी पोस्टची भर पडली आहे.
चहलनं इन्स्टा स्टोरीतून शेअर केली 'खंबीर' गोष्ट
भारतीय क्रिकेटरनं आपल्या इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केलीये. कठोर मेहनत लोकांच्या चारित्र्यावर प्रकाश टाकणारी असते. एक विशेष उंची गाठण्यासाठी या प्रवासात तुम्ही काय केलं अन् काय भोगलं ते तुम्हाला माहिती असते. आई वडिलांना अभिमानस्पद वाटावे, यासाठी घाम गाळणारा मुलगा कोणत्याही परिस्थिती खंबीर उभा असतो, अशा आशयाची पोस्ट चहलनं इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून शेअर केली आहे. पत्नी धनश्रीपासून वेगळे होणार असल्याची चर्चा रंगत असताना त्याने शेअर केलेली ही पोस्ट आता चर्चेचा विषय ठरते आहे.
एकमेकांसोबतच्या खास आठवणींची फ्रेम अन् इन्स्टाग्रामवर अनफॉलो करण्याचा खेळ
चहलनं जी गोष्ट शेअर केलीये ती धनश्रीसोबत जोडून नेटकरी दोघांच्या नात्यावर बोलू लागले आहेत. या आधीही क्रिकेटरसह त्याची पत्नी धनश्री हिच्या पोस्टवरून दोघांच्यात बिनसल्याचा अंदाज सोशल मीडियावर वर्तवण्यात येत असल्याचे पाहायला मिळाले. त्यात दोघांनी इन्स्टाग्रामवरून एकमेकांना अनफॉलो केल्याची गोष्टही चर्चेत आली. एवढेच नाही तर चहलनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून धनश्री वर्माचे सर्व फोटोही डिलिट केल्याचे दिसून आले. दुसरीकडे धनश्री वर्माच्या इन्टाग्राम अकाउंटवर मात्र चहलसोबतचे काही खास फोटो दिसत आहेत.