Join us  

भारतीय क्रिकेटपटू ५ जूनला नवी दिल्लीत पोहोचणार; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार मालिका

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी करणार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 8:43 AM

Open in App

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ ५ जूनला नवी दिल्ली येथे पोहचेल. ९ जूनपासून सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ २ जूनला भारतात येईल. या मालिकेसाठी प्रेक्षकांच्या प्रवेशासंबंधी कोणतेही निर्बंध घालण्यात आले नाहीत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले जाईल, अशी आशा आहे. 

मालिकेदरम्यान बायो-बबलही करण्यात येणार नाही. मात्र, त्याचवेळी खेळाडूंची वेळोवेळी कोरोना चाचणी होत राहील, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी याआधीच दिली होती. मालिकेतील पाच सामने नवी दिल्ली (९ जून), कटक (१२ जून), विशाखापट्टणम (१४ जून), राजकोट (१७ जून) आणि बंगळुरु (१९ जून) येथे खेळविण्यात येतील. 

डीडीसीएचे संयुक्त सचिव राजन मनचंदा यांनी सांगितले की, ‘भारतीय खेळाडू ५ जूनला दिल्लीमध्ये एकत्र येतील आणि दक्षिण आफ्रिका संघ २ जूनला येथे पोहचेल.’ भारतीय खेळाडू सध्या दोन महिने रंगलेल्या आयपीएलनंतर रजेवर आहेत.दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी - २० मालिकेसाठी भारताने आपल्या काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. यानुसार नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल भारताचे नेतृत्व करेल. तसेच विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांनाही या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

प्रतिस्पर्धी संघ

भारत- लोकेश राहुल (कर्णधार), ऋषभ पंत, अर्शदीप सिंग, आवेश खान,  युझवेंद्र चहल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा, इशान किशन, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या,  अक्षर पटेल, हर्षल पटेल, रवी बोष्णोई आणि उमरान मलिक.

दक्षिण आफ्रिका- तेम्बा बवुमा (कर्णधार), क्विंटन डीकॉक, रिझा हेंड्रिक्स, मार्को येनसेन, हेन्रीच क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, ॲन्रीच नॉर्खिया, वेन पार्नेल, द्वेन प्रीटोरियस, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स आणि रास्सी वॅन डेर डुसेन.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारत
Open in App