नवी दिल्ली - पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने बाजी मारली. त्यामुळे इम्रान यांच्याकडे पाकिस्तानचे भावी पंतप्रधान म्हणून पाहिले जात आहे. पाकिस्तानला 1992च्या विश्वचषक स्पर्धेत जेतेपद पटकावून देणा-या इम्रान यांच्या पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा लवकरच पार पडणार आहे. या समारंभाला कपिल देव, सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर हे भारताचे दिग्गज खेळाडू उपस्थित राहणार असल्याचा दावा RAW चे माजी प्रमुख एएस दौलत यांनी केला आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीती दौलत यांनी हा दावा केला. ते म्हणाले, इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला भारताचे माजी खेळाडू नक्की उपस्थित राहतील. यात सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांचा समावेश आहे. इस्लामाबाद येथे होणा-या या सोहळ्याचे या दिग्गज खेळाडूंना निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. हे सर्व इम्रान खान यांचे चांगले मित्र आहेत.
भारताचे माजी कर्णधार कपिल देव आणि सुनील गावस्कर यांनी पाकिस्तानच्या निवडणूकीत बाजी मारणा-या इम्रान खान यांचे अभिनंदन केले होते. त्याचवेळी त्यांनी इम्रान यांच्याकडून क्रिकेट संघाप्रमाणे पाकिस्तानची सेवा करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. इम्रान पंतप्रधान बनल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नातेही सुधरेल, असा विश्वास कपिल देव यांनी व्यक्त केला होता. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर विराजमान होणारे इम्रान हे पहिले खेळाडू आहेत.