नवी दिल्ली - क्रिकेट दौ-यावर जाताना अनेकदा क्रिकेटर्स आपली पत्नी किंवा गर्लफ्रेंड तसंच कुटुंबातील सदस्यांना घेऊन जाणं पसंत करतात. अशावेळी बीसीसीआयकडे क्रिकेटर्सच्या पत्नी किंवा महिला मित्रांसाठी वेगळ्या मॅनेजरची नियुक्ती करण्यात असा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. प्रशासक समितीने मात्र बीसीसीआयकडे पाठवण्यात आलेला हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. सध्या भारतीय क्रिकेट संघ दक्षिण अफ्रिका दौ-यावर असून यावेळी कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, मुरली विजय, अजिंक्य रहाणे आणि ऋद्धिमान साहा आपल्या पत्नी अनुष्का शर्मा, रितीका, नुपूर, निकिता, राधिका आणि रोमी यांना सोबत घेऊन गेले आहेत. क्रिकेटर्सच्या पत्नींना दोन आठवडे सोबत राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर ही वेळ संपत आहे. जर प्रशासक समितीकडून हिंरवा झेंडा मिळाला असता तर लॉजिस्टिक्स मॅनेजरला क्रिकेटर्सच्या पत्नी किंवा गर्लफ्रेंड्सची जबाबदारी घ्यावी लागली असती. त्यांच्या फिरण्याची तसंच इतर व्यवस्था करण्याची जबाबदारी सध्या लॉजिस्टिक्स मॅनेजरकडेच आहे. प्रशासक समितीसमोर बीसीसीआयचे लॉजिस्टिक इंचार्ज मयांक पारिख यांचं नाव ठेवण्यात आलं होतं.
सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासक समितीने बोर्ड मॅनेजमेंटला याची काही गरज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. एक अधिकारी ऋषिकेश उपाध्याय आधीच संघासोबत उपस्थित असताना याची गरज नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. हा प्रस्ताव बीसीसीआयकडून आला होता की टीम मॅनेजमेंटकडून हे मात्र स्पष्ट झालं नाही.
सलग बरसलेल्या पावसामुळे भारत - दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसºया दिवशी एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. पावसाच्या व्यत्ययामुळे तिस-या दिवसातील पहिल्या दोन सत्रात खेळ होऊ शकला नाही. यानंतर स्थानिक वेळेनुसार दुपारी सुमारे ३ वाजून ३० मिनिटांनी दिवसभराचा खेळ रद्द करण्यात आला.
आता, सामन्यातील उर्वरित दोन्ही दिवशी आकाश निरभ्र राहणार असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. तसेच, दोन्ही दिवशी प्रत्येकी ९८ षटकांचा खेळ खेळविण्यात येईल. या दोन्ही दिवशी निर्धारित वेळेनुसार सामन्याला सुरुवात होईल. परंतु, अंतिम दोन सत्रांमध्ये प्रत्येकी १५ मिनिटांचा अतिरिक्त खेळ होणार असून षटके पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त अर्ध्या तासाचाही खेळ खेळविला जाऊ शकेल.
दरम्यान, रविवारच्या दिवशी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेली होती. सामना सुरू होण्याच्या वेळेला पावसाचा जोर खूप वाढला होता. त्याचवेळी, विश्रांतीनंतर काही वेळासाठी पाऊस थांबला आणि यादरम्यान कर्मचाºयांनी मैदान सुकविण्यासाठी प्रयत्न केले. या वेळी तीन कव्हर हटवून सुपर सॉपरचाही वापर करण्यात आला. मात्र, यानंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली. यामुळे ज्या ठिकाणी मैदान सुकविण्यात आले होते, तेथे पुन्हा एकदा पाणी भरले.
संपूर्ण दिवस पावसाने वाया गेल्यानंतरही दोन दिवस शिल्लक असल्याने सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना २८६ धावा उभारल्यानंतर भारताला २०९ धावांची मजल मारता आली. यानंतर ७७ धावांची आघाडी घेऊन मैदानात उतरलेल्या यजमानांनी दुसºया डावात २ बाद ६५ धावांची मजल मारली असून ते आता एकूण १४२ धावांच्या आघाडीवर आहेत.