दुबई: टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानं पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं. ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावून घेतला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतरही पाकिस्तानच्या यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानचं कौतुक झालं. सामन्याच्या दोन दिवस आधी रिझवान आयसीयूमध्ये दाखल झाला होता. आता रिझवानच्या डॉक्टरांनी त्यावेळची नेमकी परिस्थिती सांगितली आहे.
पाकिस्तानचा सलामीवीर उपांत्य फेरीच्या सामन्याआधी आयसीयूमध्ये उपचार घेत होता. दोन दिवसांपूर्वी आयसीयूमधील बेडवर पडून असलेल्या रियाझला मैदानावर फटकेबाजी करताना पाहून भारतीय डॉक्टर चक्रावून गेले. मला उपांत्य फेरीचा सामना खेळायचाय, मला टीमसोबत राहायचंय, असं रिझवान उपचारादरम्यान सतत डॉक्टरांना सांगत होता. रिझवाननं दाखवलेल्या या साहसाचं डॉक्टरांनी कौतुक केलं आहे.
टी-२० विश्वचषकात उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा मुकाबला करण्याआधी रिझवानच्या छातीत वेदना सुरू झाल्या. त्यामुळे दोन आठवडे तो आयसीयूमध्ये होता. एका भारतीय डॉक्टरांनी रिझवानवर उपचार केले. या डॉक्टरांना रिझवाननं एक खास गिफ्ट दिलं. रिझवाननं त्याच्या नावाची स्वाक्षरी असलेली जर्सी डॉक्टरांना भेट म्हणून दिली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना पाकिस्तानसाठी महत्त्वाचा होता. त्यामुळेच दोन दिवस आयसीयूमध्ये उपचार घेऊन रिझवान संघासाठी मैदानावर उतरला. रिझवान इतक्या वेगानं सावरून मैदानावर फलंदाजीसाठी आला, ते पाहून मी चकित झालो, अशी भावना दुबईच्या मेडिओर रुग्णालयातील पल्मोनोलॉजिस्ट डॉ. साहिर सैनालबदीन यांनी व्यक्त केली. ९ नोव्हेंबरला दुपारी १२.३० वाजता रिझवान मेडिओर रुग्णालयात दाखल झाला. त्यावेळी त्याला ताप, खोकल्याचा त्रास होता. छातीत वेदना होत्या. डॉक्टरांनी त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू केले. त्यानंतर ११ नोव्हेंबरला रिझवान ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरला.