दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमावणाऱ्या भारताला पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आज भारतासाठी करो वा मरोची स्थिती आहे. आज होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभूत झाल्यास भारताला मालिका गमवावी लागेल. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं ३१ धावांनी विजय मिळवत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. यानंतर आता पाकिस्तानचा माजी गोलंदाज दानिश कनेरियानं एक वादग्रस्त दावा केला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यावेळी भारतीय ड्रेसिंग रुम २ गटांत विभागला होता. के. एल. राहुल आणि विराट कोहली वेगवेगळे बसले होते. कोहलीचा मूडदेखील वेगळा दिसत होता. तो कर्णधार असताना जसा दिसायचा, तसा दिसत नव्हता. पण विराट लवकरच कमबॅक करेल, असं कनेरिया म्हणाला. स्वत:च्या यूट्यूब चॅनलवर त्यानं हा दावा केला.
के. एल. राहुल मर्यादित षटकांच्या सामन्यात भारताचा उपकर्णधार आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सध्या संघाचं नेतृत्त्व राहुलकडे आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताची मधली फळी कोसळली. आफ्रिकेनं दिलेल्या २९७ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली. शिखर धवन आणि विराट कोहलीनं अर्धशतकी खेळी केली. मात्र ते बाद होताच भारतीय फलंदाजी कोसळली.