नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर काल जीवघेणा हल्ला झाला. मारेकऱ्याने इम्रान खान यांच्या ताफ्यावर गोळीबार केला, या गोळीबारात माजी पंतप्रधानांच्या दोन्ही पायांना जखमा झाल्या. घटनास्थळी असेलल्या सुरक्षारक्षकांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला अटक करण्यात आली आहे. खरं तर या गोळीबाराची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने अथवा संघटनेने स्वीकारलेली नाही. इम्रान खान यांच्यासोबतच आणखी चार व्यक्ती गोळीबारात जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला आहे. आता या घटनेवरून क्रिकेट वर्तुळात देखील मोठी चर्चा रंगली आहे. कारण आगामी 2023चा आशिया चषक पाकिस्तानच्या धरतीवर होणार आहे.
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीने हल्ल्याची कबुली दिली आहे. त्याला हल्ला करताना पकडण्यात आले होते. तसेच मारेकऱ्याने इम्रान खान यांच्यावर जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. खरं तर सर्वप्रथम हल्ला करणाऱ्याचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले होते, मात्र आता त्याची प्रकृती ठीक आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली असून इम्रान खान यांना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार इम्रान खान यांनी सध्या पाकिस्तानात 'आझादी मोर्चा' काढला आहे. सरकार विरोधी लढ्यात ते रस्त्यावर उतरले आहेत आणि निदर्शने करत आहेत.
आगामी आशिया चषक तटस्थ ठिकाणी खेळवावा
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय चाहत्यांनी आगामी 2023चा आशिया चषक तटस्थ ठिकाणी खेळवण्याची मागणी केली आहे. खरं तर बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई संघटनेचे अध्यक्ष जय शाह यांनी याआधीच ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी व्हावी अशी मागणी केली होती. त्यानंतर मोठा वाद रंगला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने लांबलचक पत्रक काढून बीसीसीआयवर निशाणा साधला होता. याशिवाय भारतात होणाऱ्या 2023च्या एकदिवसीय विश्वचषकावर पाकिस्तानी संघ बहिष्कार टाकेल अशी धमकी देखील पीसीबीने दिली होती.
इम्रान खान यांच्यावर जीवघेणा हल्ला
ज्या दिवसापासून इम्रान खान तोशखाना प्रकरणात दोषी ठरवले गेले आहेत. तेव्हापासूनच त्यांनी आझादी मोर्चाला सुरुवात केली आहे. याच अंतर्गत गुरुवारी वजिराबाद येथे मोर्चाचे आयोजन केले गेले होते. यात स्वत: इम्रान खान देखील सहभागी झाले होते. वजिराबाद येथे रॅली सुरू असतानाच गोळीबार झाला आहे. इम्रान खान यांच्या कंटेनरजवळ वजीराबाद येथील जफर अली खान चौकाजवळ गोळीबार झाल्याची माहिती पाकिस्तानी माध्यमांनी दिली आहे. इम्रान खान यांच्यासोबतच माजी राज्यपाल इमरान इस्मेल देखील जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
Web Title: Indian fans are demanding that the 2023 Asia Cup be played at a neutral venue after the attack on former Pakistan Prime Minister Imran Khan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.