ब्रिस्बेन : टी-20 विश्वचषकातील सराव सामने खेळण्यासाठी भारतीय संघ 15 ऑक्टोबर रोजी ब्रिस्बेनला दाखल झाला. इथे भारतीय संघाचे दोन सामने होणार होते. त्यातील एक सामना आज पार पडला, ज्यामध्ये भारतीय संघाने यजमान कांगारूच्या संघाचा 6 धावांनी पराभव केला. मात्र भारतीय संघ इथे पोहचताच नाराजीचे वातावरण पसरले आहे. माहितीनुसार, मेन इन ब्लू आयसीसी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या सुविधांबद्दल भारतीय चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला 4 स्टार हॉटेलमध्ये चेक-इन करण्यास सांगण्यात आले. तर यजमान ऑस्ट्रेलियाला त्याच शहरात 5 स्टार सुविधा असलेले हॉटेल उपलब्ध आहे. लक्षणीय बाब म्हणजे ज्या हॉटेलमध्ये यजमान ऑस्ट्रेलियाचा संघ आहे त्याच हॉटेलमध्ये पाकिस्तानी संघही मुक्कामाला आहे. हे समोर येताच भारतीय चाहत्यांनी आयसीसी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियावर निशाणा साधला आहे.
भारतीय संघाशी केलेल्या दुजाभावामुळे सोशल मीडियावर वाद चिघळला आहे. या कृत्यामुळे भारतीय चाहते प्रचंड संतापले असून ते आयसीसीला फटकारत आहेत. खरं तर आयसीसी इव्हेंट्स दरम्यान, यजमान देशासह आंतरराष्ट्रीय क्रिकेट संस्थेद्वारे संघांच्या निवासाची व्यवस्था केली जाते, परंतु येथे यजमानांना पाहुण्या संघांपेक्षा चांगली सुविधा मिळत असल्याचे उघड झाले आहे.
भारतीय संघाची विजयी सलामी
सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ब्रिस्बेन स्टेडियमवर सामना खेळवला गेला. भारतीय संघाने शानदार खेळी करून कांगारूच्या संघावर 6 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 बळी पटकावले. तर भुवनेश्वर कुमार (2), अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या, आणि युजवेंद्र चहल यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 186 धावा केल्या होत्या. ज्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाला 20 षटकांत सर्वबाद 180 धावा करण्यात यश आले. भारताकडून सलामीवीर लोकेश राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतकी खेळी केली होती. यांच्याव्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्मा (15), विराट कोहली (19) आणि दिनेश कार्तिक (20) धावा करून बाद झाला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Indian fans are furious with ICC and Cricket Australia for providing 4-star hotels to the Indian team and 5-star hotels to Pakistan in Australia
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.