Join us  

Arshdeep singh: भारतीय फॅन्सने सर्वांसमोर अर्शदीपला म्हटले 'गद्दार', गोलंदाजाने दिली 'ही' प्रतिक्रिया

भारतीय चाहत्याने अर्शदीप सिंगला सर्वांसमोर गद्दार असे संबोधले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2022 2:47 PM

Open in App

नवी दिल्ली : आशिया चषकातील (Asia Cup 2022) भारतीय संघाच्या प्रदर्शनामुळे सर्वजण नाराज आहेत. भारताला सुपर-4 मधील आपल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या 4 संघांनी सुपर-4 मध्ये प्रवेश केला आहे. मंगळवारी झालेल्या भारत आणि श्रीलंका या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. कारण भारताला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी इतर संघावर अवलंबून राहावे लागणार आहे. सलगच्या पराभवानंतर भारतीय खेळाडूंना चाहत्यांचा रोषाचा सामना करावा लागत आहे. सध्या अर्शदीप सिंगला मोठ्या प्रमाणात टीकाकारांचा सामना करावा लागत आहे. 

चाहत्याने अर्शदीपला म्हटले गद्दारसोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये भारतीय संघाचे खेळाडू स्टेडियमच्या बाहेर निघाल्यावर बसमध्ये जात होते. त्याचवेळी बसजवळ उभ्या असलेल्या एका चाहत्याने अर्शदीपला पाहताच त्याला गद्दार म्हणण्यास सुरुवात केली. चाहता म्हणाला, "बघा, गद्दार आला आहे." अर्शदीप सिंगने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात झेल सोडला होता त्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. खरं तर अर्शदीप बसमध्ये चढला होता पण फॅनचा आवाज ऐकून त्याने त्याच्याकडे रोखून पाहिले. बसजवळ उभे असलेल्या पत्रकारांनी चाहत्याला जोरदार फटकारले आणि पुन्हा असे कृत्य करू नका असे सांगितले. मात्र अर्शदीपने कोणतीही शाब्दिक प्रतिक्रिया दिली नाही. 

अर्शदीप सिंगने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात आसिफ अलीचा झेल सोडला होता. त्यानंतर आसिफने एक चौकार आणि एक षटकार ठोकून पाकिस्तानची विजयाकडे कूच केली होती. त्यामुळे अर्शदीप सिंगच्या चुकीमुळेच भारताचा पराभव झाला असा चाहत्यांमध्ये सूर आहे. 

श्रीलंकेच्या विजयाची हॅट्रिक श्रीलंकेचा खेळ दिवसेंदिवस बहरत चालला आहे. आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यातील पराभवानंतर श्रीलंकेने दमदार पुनरागमन केले. सुपर-4 च्या कालच्या सामन्यात त्यांनी जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतालाच बाहेर केले. भारताने विजयासाठी ठेवलेले 174 धावांचे लक्ष्य श्रीलंकेने 6 गडी व 1 चेंडू राखून रोमहर्षक रित्या पार केले. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून कुसल मेंडिस ( 57) व पथूम निसंका (52) यांनी श्रीलंकेला दमदार सुरूवात करून दिली. त्यांनी पहिल्या बळीसाठी 97 धावांची भागीदारी नोंदवली. त्यानंतर दासून शनाका व भानुका राजपक्षा यांनी 34 चेंडूंत नाबाद 64 धावा करून 6 गडी राखून विजय मिळवला. शनाका 18 चेंडूंत 33 धावांवर, तर राजपक्षा 25 धावांवर नाबाद राहिला. 

 

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध श्रीलंकाट्रोलभारतीय क्रिकेट संघ
Open in App