नवी दिल्ली : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यापुढे कसोटी आणि वन डे सामन्यात खेळण्यास उत्सुक नसल्याची माहिती पुढे आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, तो फक्त टी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यास इच्छुक दिसतो. भुवनेश्वरला विश्व कसोटी चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळाले नाही. त्याला वगळल्यामुळे अनेक आजीमाजी खेळाडूंनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. भुवनेश्वर कुमारच्या निकटवर्तीय सूत्रांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, भुवीला वनडे क्रिकेटमध्येही रस नाही आणि त्याला फक्त टी-२० खेळायचे आहे. तो टी-२० क्रिकेटमध्ये पुढील संधीची तयारी करत आहे. त्याला यापुढे कसोटी क्रिकेट खेळायचे नाही. आता त्याची लय गेली आहे.’ खरे सांगायचे झाले, तर भुवी एकदिवसीय क्रिकेट खेळण्यास इच्छुक असेल, असे निवड समितीलासुद्धा वाटत नाही.
भारतीय संघाचे हे मोठे नुकसान आहे, इंग्लंड दौऱ्यासाठी कोणत्या खेळाडूला संघात असायला हवे होते, तर तो भुवनेश्वर कुमार होता”, असे सूत्राने सांगितले.भुवीने जानेवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. तेव्हापासून दुखापतीमुळे तो संघात आत-बाहेर होत राहिला बरेचदा दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो आयपीएल किंवा भारताकडून सातत्याने खेळू शकला नाही. कदाचित यामुळेच भुवनेश्वरने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला असावा. भुवनेश्वरने २०१३ मध्ये भारताकडून कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. त्यानंतर आतापर्यंत त्याने केवळ २१ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात ६३ बळी घेतले आहेत.