मोहम्मद शमी हे नाव घेतलं की डोळ्यासमोर येतो तो २०२३ चा वन डे विश्वचषक... भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने यंदाचा वन डे विश्वचषक गाजवला असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. स्पर्धेच्या सुरूवातीला प्रतीक्षेत असलेल्या शमीला संधी मिळताच त्याने संधीचं सोनं केलं. स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात 'पंजा' मारून आपली ताकद दाखवण्यात त्याला यश आलं. त्यानंतर शमीचा हा दबदबा वाढतच गेला अन् भारतानं मोठ्या फरकानं सामने जिंकले. न्यूझीलंडविरूद्धच्या उपांत्य सामन्यात तर शमीने ७ बळी घेऊन संघाला फायनलचं तिकिट मिळवून दिलं. पण, विश्वचषक गाजवणारा शमी अंतिम सामन्यातील पराभवानंतर भावूक दिसला. विश्वचषक गाजवणारा शमी स्पर्धा संपल्यानंतर देखील प्रसिद्धीच्या झोतात कायम आहे.
दरम्यान, अलीकडेच मोहम्मद शमीने प्रवासादरम्यान वाटेत अपघात झालेल्या नागरिकांची मदत केली, ज्यावरून त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. शमीने आता क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर, दिग्गज अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरसोबतचे फोटो शेअर केले आहेत. तसेच याला कॅप्शन सुचवण्याचे आवाहन त्याने चाहत्यांना केले आहे.
मिचेल मार्शवर शमीचे टीकास्त्र
विश्वचषक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल मार्शचा एक फोटो खूप व्हायरल झाला, ज्यामध्ये तो ट्रॉफीवर पाय ठेवलेल्या अवस्थेत दिसतो. यावरून शमीने कांगारूंचे कान टोचले होते. यंदाच्या पर्वात मोहम्मद शमीने सर्वाधिक २४ बळी घेऊन प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना घाम फोडला. शमी त्याच्या मूळ गावी उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे पोहचल्यानंतर स्थानिक पत्रकारांनी त्याच्याशी संवाद साधला. माध्यमांशी बोलत असताना शमीने मिचेल मार्शच्या व्हायरल फोटोवर भाष्य केले. "मिचेल मार्शचा ट्रॉफीसोबतचा असा फोटो पाहून मला वाईट वाटते. ही तिच ट्रॉफी आहे जिच्यासाठी जगभरातील संघ भिडत होते, जिंकल्यावर तिला डोक्यावर घेऊन मिरवायचं होतं, पण मार्शने तिच्यावर पाय ठेवला... हे पाहून खरंच खूप वाईट वाटलं", असे शमीने सांगितले होते.
अंतिम फेरीत भारताचा पराभव
किताबाच्या लढतीत नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान संघाला शुबमन गिलच्या (४) रूपात मोठा झटका बसला. त्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (४७) आणि विराट कोहली (५४) यांनी डाव सावरला. पण ग्लेन मॅक्सवेलच्या षटकांत चुकीचा फटका मारून रोहित बाद झाला. ट्रॅव्हिस हेडने अप्रतिम झेल घेऊन हिटमॅनला बाहेरचा रस्ता दाखवला. दुसरीकडे विराट सावध खेळी करून भारताचा डाव पुढे नेत होता. अशातच ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने यजमानांना आणखी एक धक्का देत श्रेयस अय्यरला तंबूत पाठवले. मग विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी भारतीयांच्या आशा जिवंत ठेवल्या अन् भागीदारी नोंदवली. निर्धाव चेंडूमुळे दबाव वाढत गेल्याने भारत अडचणीत सापडला. त्यात विराटला नशिबाची साथ न मिळाल्याने बाहेर जावे लागले. विराटने (५४) आणि राहुलने (६६) धावा करून ऑस्ट्रेलियासमोर सन्माजनक आव्हान उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. अखेर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या. २४१ धावांचा पाठलाग करताना कांगारूंनी ट्रॅव्हिस हेडच्या (१३७) शतकी खेळीच्या जोरावर मोठा विजय मिळवला.
Web Title: Indian fast bowler Mohammed Shami posted a photo with master blaster Sachin Tendulkar and asked fans to suggest captions
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.