नवी दिल्ली: भारताचा जलदगती गोलंदाज रुद्र प्रताप सिंग याने भावनिक ट्विट करून मंगळवारी निवृत्ती जाहीर केली. या डावखुऱ्या गोलंदाजाने ५८ वन डे आणि १४ कसोटी सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. १३ वर्षांपूर्वी म्हणजेच २००५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ३२ वर्षीय सिंगने ट्विट केले की,' आज मी माझे बूट खुंटीला टांगत आहे आणि निवृत्ती जाहीर करत आहे. या प्रवासात मला मदत व मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येकाचे आभार.'
सिंगच्या नावे ४२.०५ च्या सरासरीने कसोटीत ४० विकेट आहेत, तर ५८ वन डे सामन्यांत त्याने ६९ विकेट घेतल्या आहेत. त्याने १० ट्वेंटी-२० सामन्यांतही भारताचे प्रतिनिधित्व करताना १५ विकेट नावावर केल्या आहेत. त्याने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ८२ सामने खेळले आहेत. २००८ साली डेक्कन चार्जर्स संघाकडून त्याचा आयपीएल प्रवास सुरु झाला तो २०१६ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स असा थांबला.
त्याने लिहिले की,' १३ वर्षांपूर्वी ४ सप्टेंबर २००५ मध्येच मी पहिल्यांदा निळी जर्सी घातली. माझ्या आयुष्यातील तो अविस्मरणीय क्षण होता. स्वप्नांच्या दिशेने टाकलेले ते पहिले पाऊल होते. ' २००७ साली राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता आणि तेथे सिंगने एका डावात घेतलेल्या पाच विकेट, हा त्याच्या कारकिर्दीत आणखी एक अविस्मरणीय क्षण होता. भारताने ३ कसोटी सामन्यांची ती मालिका १-० अशी जिंकली होती.
Web Title: Indian fast bowler Rudra Pratap Singh retires from international cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.