नवी दिल्ली: भारताचा जलदगती गोलंदाज रुद्र प्रताप सिंग याने भावनिक ट्विट करून मंगळवारी निवृत्ती जाहीर केली. या डावखुऱ्या गोलंदाजाने ५८ वन डे आणि १४ कसोटी सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. १३ वर्षांपूर्वी म्हणजेच २००५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ३२ वर्षीय सिंगने ट्विट केले की,' आज मी माझे बूट खुंटीला टांगत आहे आणि निवृत्ती जाहीर करत आहे. या प्रवासात मला मदत व मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येकाचे आभार.'
सिंगच्या नावे ४२.०५ च्या सरासरीने कसोटीत ४० विकेट आहेत, तर ५८ वन डे सामन्यांत त्याने ६९ विकेट घेतल्या आहेत. त्याने १० ट्वेंटी-२० सामन्यांतही भारताचे प्रतिनिधित्व करताना १५ विकेट नावावर केल्या आहेत. त्याने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ८२ सामने खेळले आहेत. २००८ साली डेक्कन चार्जर्स संघाकडून त्याचा आयपीएल प्रवास सुरु झाला तो २०१६ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स असा थांबला.