Join us  

भारतीय खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजांचा दबदबा

भारतीय संघाने कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन्ही सामने डावाने जिंकत बांगलादेशला सहजपणे व्हाइटवॉश दिला. यावरूनच विराट कोहलीचा संघ किती बलाढ्य आहे हे दिसून येते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 5:12 AM

Open in App

- अयाझ मेमन(कन्सल्टिंग एडिटर लोकमत)भारतीय संघाने कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन्ही सामने डावाने जिंकत बांगलादेशला सहजपणे व्हाइटवॉश दिला. यावरूनच विराट कोहलीचा संघ किती बलाढ्य आहे हे दिसून येते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारतीय खेळपट्ट्यांवर भारतीय वेगवान गोलंदाजांनी केलेली बळींची लयलूट. साधारणपणे भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंचे वर्चस्व असते. त्यामुळेच हा भारतीय क्रिकेटमधील नवा अध्याय आहे. भारतीय खेळाडूंचे सादर करण्यात आलेले रिपोर्ट कार्ड...मयांक अगरवाल(१० पैकी ८ गुण)कसोटी संघात मयांकने सलामीवीर म्हणून आपले स्थान भक्कम केले आहे. अत्यंत लक्षपूर्वक खेळताना मयांकने आपल्या तंत्रशुद्ध खेळाचे प्रदर्शन केले. पहिल्या कसोटीत झळकावलेल्या द्विशतकाने त्याने पुन्हा एकदा आपल्यात मोठी खेळी खेळण्याची क्षमता असल्याचे सिद्ध केले.रोहित शर्मा (१० पैकी ३)दक्षिण आफ्रिकेत रोहितने ५००हून अधिक धावा फटकावल्या, मात्र बांगलादेशविरुद्ध त्याला धावा काढता आल्या नाहीत. दोन्ही डावांत मिळून त्याने केवळ २७ धावाच केल्या. त्याने फॉर्म गमावल्याचे वाटले नाही, पण तरी त्याच्या कामगिरीने संघव्यवस्थापनाची चिंता मात्र वाढली.चेतेश्वर पुजारा (१० पैकी ७)दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी करत पुजाराने कसोटी क्रिकेटमधील धावांची खाण कायम राखली. नेहमी बचावावर भर देणाऱ्या पुजाराने जम बसताच संघाची धावगती वाढवितानाच बांगलादेशच्या गोलंदाजांना दबावाखाली ठेवले.विराट कोहली (१० पैकी ८.५)पहिल्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर कोहलीने दिवस-रात्र कसोटीत मात्र सर्व कसर भरून काढत तडाखेबंद शतक झळकावले. याशिवाय त्याने आक्रमक नेतृत्व केले. खासकरून त्याने वेगवान गोलंदाजांचा आक्रमकतेने वापर केला.अजिंक्य रहाणे (१० पैकी ७.५)दोन्ही डावांत रहाणेने अर्धशतक झळकावले. पहिल्या कसोटीत त्याने प्रतिकूल परिस्थितीत ८६ धावा काढत संघाला सावरले. त्याने पुन्हा एकदा फॉर्म मिळवताना भारताचा भरवशाचा फलंदाज असा लौकिक मिळवला.रिद्धिमान साहा (१० पैकी ६):यष्टीरक्षणात जबरदस्त कामगिरी केलेल्या साहाने आपली क्षमता आणि अनुभव सिद्ध केले. आघाडीचे फलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने फलंदाजीत साहाला फारशी संधी मिळाली नाही.रवींद्र जडेजा (१० पैकी ५.५) :कर्णधार विराट कोहलीने या मालिकेत वेगवान गोलंदाजांचा अधिक वापर केल्याने स्टार फिरकीपटू रवींद्र जडेजा गोलंदाज म्हणून मर्यादित राहिला. दोन्ही कसोटींत मिळून त्याने केवळ १९ षटके गोलंदाजी केली, पण एकही बळी मिळाला नाही, हे विशेष. याशिवाय पहिल्या कसोटीत अर्धशतक झळकावून रवींद्र जडेजाने आपल्या फलंदाजीत वेगाने सुधारणा होत असल्याचे दाखविले. विशेष म्हणजे संघाला गरज असताना त्याने प्रतिकूल परिस्थितीत अर्धशतकी खेळी केली.रविचंद्रन अश्विन (१० पैकी ५.५) वेगवान गोलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने अश्विनला आपल्या खात्यातील सगळी षटके गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. तरी, पहिल्या कसोटीत त्याने ५ बळी घेत आपली छाप पाडली. तसेच, फलंदाज म्हणून फार काही करता आले नाही.इशांत शर्मा (१० पैकी ९) :आक्रमक व उच्च दर्जाच्या कौशल्याने इशांतने मारा केला. दुसºया कसोटीच्या पहिल्या डावातील इशांतचा पहिला स्पेल अत्यंत भेदक होता. यामुळे त्याने बांगलादेशच्या मोठ्या धावसंख्येच्या स्वप्नाला सुरुंग लावला. वाढत्या वयानुसार तो चांगली कामगिरी करीत आहे.उमेश यादव (१० पैकी ९) :कौशल्य आणि भेदकता यामध्ये उमेश इशांतच्या मागे राहिला नाही. त्याने लेट स्विंग करताना फलंदाजांना कायम दबावाखाली ठेवले. इशांतला उमेशच्या भेदकतेची साथ मिळाल्याने दुसºया कसोटी सामन्याचा तिसरा दिवस झटपट संपला. उमेशने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर अंतिम एकादशमध्ये दमदार पुनरागमन केले.मोहम्मद शमी (१० पैकी ८.५) :भारताच्या वेगवान त्रिकूटातील तिसरा व महत्त्वाचा भाग असलेल्या शमीने यंदा घरच्या मैदानावर मोठा प्रभाव टाकला. स्टॅमिना व तंदुरुस्तीवर मोठी मेहनत घेतल्यामुळेच शमीने आपल्या गोलंदाजीत कमालीची सुधारणा केली. शमीच्या गोलंदाजीत अप्रतिम कौशल्य असून त्यात आणखी प्रगती होत आहे.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध बांगलादेश