आयसीसीने भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकाचे मंगळवारी वेळापत्रक जाहीर केले. यावेळी भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग एक एक्सपर्ट म्हणून आपल्या कारकिर्दीतील आठवणींना उजाळा देण्यासाठी ब्रॉडकास्ट स्टुडिओमध्ये उपस्थित होता. वीरूने २०११ च्या विश्वचषकातील आठवणी सांगताना एक मोठा खुलासा केला आहे. तत्कालीन भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने केवळ खिचडी खाऊन विश्वचषक खेळला असल्याचे वीरूने म्हटले आहे.
सेहवागने सांगितले कारण वन डे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना वीरेंद्र सेहवागने म्हटले, "'प्रत्येकाच्या मनात काही ना काही विश्वास होता आणि प्रत्येकजण आपापल्या विश्वासाचे पालन करत होता. धोनीला संपूर्ण विश्वचषकादरम्यान 'खिचडी' खाण्यावर विश्वास होता. तो म्हणायचा की मी धावा करत नसलो तरी ही युक्ती काम करत आहे आणि म्हणूनच आपण सामने जिंकत आहोत. त्यामुळे २०११ मध्ये भारताने विश्वचषचक उंचावला."
श्रीलंकेला पराभूत करून भारत 'जगज्जेता'मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेला अंतिम सामना आणि ते सुवर्णक्षण आजही भारतीयांच्या मनात ताजे आहेत. २ एप्रिल २०११ च्या दिवशी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने विश्वचषक जिंकून इतिहास रचला. कॅप्टन कूल धोनीने षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. १२ वर्षांपूर्वी भारताने विश्वचषक जिंकला मात्र त्यानंतर अद्याप भारताला एकदाही हा किताब पटकावता आला नाही. २८ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर भारतीयांना जगज्जेता झाल्याचे सुख मिळाले होते. महेंद्रसिंग धोनीने षटकार मारताच भारताने विश्वचषकाचा दुष्काळ संपवून जगज्जेता होण्याचे स्वप्न साकार केले. श्रीलंकेविरूद्धच्या फायनलच्या सामन्यात भारताने लंकेला ६ गडी राखून पराभवाची धूळ चारली.