मुंबई : भारतीय संघाचे माजी कसोटीपटू माधव आपटे यांचे सोमवारी पहाटे 6.09 वाजता निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. त्यांनी भारताकडून 7 कसोटी सामने खेळले होते. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना त्यांच्याच घरच्या प्रेक्षकांसमोर त्यांनी धु धु धुतले होते. त्यांच्या नाबाद 163 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने विंडीजविरुद्धचा सामना अनिर्णित सोडवला होता. विंडीजमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा त्यांचा हा विक्रम 18 वर्ष अबाधित होता.
मुंबईकडून पदार्पणाच्या रणजी सामन्यात त्यांनी सौराष्ट्रविरुद्ध शतकी खेळी केली होती. 1952-53साली पाकिस्तानविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी त्यांची संघात निवड झाली होती. त्यात त्यांनी साजेशी कामगिरी केली आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीचे स्थानही पक्के केले. त्यांनी पाचही सामन्यांत सलामीला येताना 51.11च्या सरासरीनं 460 धावा केल्या. त्यात एक शतक व तीन अर्धशतकांचा समावेश होता.
पण, त्यानंतर त्यांना संघातून डच्चू देण्यात आला. पुन्हा ते भारतीय संघाकडून कधीच कसोटी क्रिकेट खेळू शकले नाही. त्यांनी मुंबईचे प्रतिनिधित्व करताना रणजी क्रिकेटमध्ये 39.80च्या सरासरीनं 2070 धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 67 सामन्यांत 3336 धावा आहेत आणि त्यात 6 शतकांचा समावेश आहे.