Indian Head Coach Rahul Dravid On India's victory in T20 World Cup 2024 : टीम इंडियाने विश्वचषक जिंकताच संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आनंद व्यक्त केला. तसेच एक खेळाडू म्हणून कधी ट्रॉफी जिंकता आली नाही ही खदखद देखील बोलून दाखवली. भारताच्या क्रिकेट संघाने १३ वर्षांच्या ट्रॉफीचा दुष्काळ संपवत शनिवारी ऐतिहासिक कामगिरी केली. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने १३ वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली, तर २००७ नंतर भारताने प्रथमच ट्वेंटी-२० विश्वचषक उंचावला. या विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटला अर्थात ट्वेंटी-२० क्रिकेटला रामराम केले. दक्षिण आफ्रिकेच्या तोंडचा घास पळवून रोहितसेनेने विजय साकारला. जेतेपद पटकावल्यानंतर सर्वच भारतीय खेळाडू भावूक झाल्याचे दिसले.
राहुल द्रविड म्हणाले की, भारतीय क्रिकेट संघात असलेल्या युवा खेळाडूंमध्ये खूप प्रतिभा आहे, त्यांच्यामध्ये टॅलेंटची काहीच कमतरता नाही. त्यांच्याकडे चांगला आत्मविश्वास आहे. आगामी काळात... पुढच्या पाच ते सहा वर्षांच्या कालावधीत भारतीय संघ खूप सारे किताब जिंकेल यात शंका नाही. दोन वर्षांपूर्वी टीम इंडियाला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले होते. पण, आज तमाम भारतीयांचे स्वप्न सत्यात उतरले. आम्हाला ज्या प्रकारे संघाची बांधणी आणि ज्या प्रकारचे कौशल्य हवे होते ते आज पाहायला मिळते आहे. २०२१ मध्ये मी मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारले तेव्हापासून यावर काम केले.
भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तीबद्दल बोलताना द्रविड यांनी सांगितले की, एक व्यक्ती म्हणूनही मी रोहितला खूप मिस करेन. त्याने त्याच्या व्यक्तिमत्त्वामुळे मला खूप प्रभावित केले. त्याने मला दिलेला आदर, काळजी आणि संघासाठी सतत झटणारा रोहित... तो एक अप्रतिम खेळाडू आहेच शिवाय व्यक्ती म्हणून मी त्याला नेहमीच मिस करेन.
तसेच एक खेळाडू म्हणून ट्रॉफी जिंकण्याइतपत मी भाग्यवान नव्हतो. मी प्रत्येकवेळी माझे सर्वोत्तम दिले. पण मी नशीबवान आहे की, मला भारतीय संघाचे प्रशिक्षक बनण्याची संधी मिळाली. मी नशीबवान आहे की, टीम इंडियातील शिलेदारांनी माझ्यासाठी हे शक्य करून दाखवले. १३ वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी भारताला मिळाली. ही एक छान भावना आहे. काहीतरी मिळवण्याचे माझे ध्येय अजिबात नव्हते. कारण हे मी करत असलेले एक काम होते. खरोखर हा एक खूपच चांगला प्रवास होता, असेही टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी नमूद केले.