वन डे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. साखळी फेरीतील सामने झाले असून यजमान भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या चार संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. उपांत्य फेरीतील पहिला सामना यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आमनेसामने असेल. भारतीय संघाने सलग नऊ विजय मिळवत स्पर्धेत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानी संघावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.
खासकरून कर्णधार बाबर आझमच्या कर्णधारपदावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डात वाद सुरू आहे. अनेक माजी खेळाडूंनी त्याला कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा सल्ला दिला. मात्र, भारतीय दिग्गज कपिल देव यांनी बाबर आझमचा बचाव केला असून टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे.
बाबरच्या समर्थनार्थ कपिल देव मैदानातबाबर आझमचा बचाव करताना कपिल देव यांनी म्हटले, "चाहत्यांनी हे विसरू नये की बाबर आझमने काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानी संघाला आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर नेले होते. बाबर आझम सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे आणि सर्वजण केवळ त्याची आताच्या घडीची कामगिरी पाहत आहेत. ६ महिन्यांपूर्वी पाकिस्तानी संघाला नंबर वन संघ बनवणारा तो कर्णधार आहे. तो एक सामान्य खेळाडू असून सुपरस्टार म्हणून त्याने ओळख बनवली आहे. त्यामुळे सध्याच्या कामगिरीवर कधीही लक्ष केंद्रित करू नये, त्यामागील कामगिरीवर लक्ष केंद्रित करायला हवे." ते एका युट्यूब चॅनेलवर बोलत होते.
दरम्यान, वन डे विश्वचषक २०२३ पाकिस्तानी संघासाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला. बाबर आझमच्या नेतृत्वातील संघाला नऊपैकी केवळ चार सामने जिंकता आले. तर उर्वरित पाच सामन्यांत पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तान २०२३ च्या विश्वचषकापूर्वी उपांत्य फेरी गाठण्याचा प्रबळ दावेदार मानला जात होता, परंतु बाबर आझम अँड कंपनीने विश्वचषकात ज्याप्रकारे कामगिरी केली, त्यामुळे पाकिस्तानचे क्रिकेट चाहते खूपच निराश झाले आहेत. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनीही बाबर आझमच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले आहेत.