SachinTendulkar statue in Wankhede stadium | मुंबई : आपल्या स्ट्रेट ड्राईव्हने अवघ्या क्रिकेट विश्वाच्या नजरा आपल्याकडे खेचणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला तमाम भारतीयांनी भरभरून प्रेम दिलं. आजही युवा क्रिकेटपटू सचिनकडे पाहून क्रिकेटचे धडे घेतात. भारताला लाभलेल्या या रत्नाचा सन्मान भारत सरकारने भारतरत्न देऊन केला. पण, ज्या भूमीत स्ट्रेट ड्राईव्हचा बादशाह, क्रिकेटचा देव, सर्वांचा लाडका मराठमोळा सचिन घडला त्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर तेंडुलकर अर्थात 'क्रिकेटचा देव' अवतरला आहे. होय, कारण वानखेडे स्टेडियमवर नवोदित क्रिकेटपटूंना प्रेरणा मिळावी म्हणून अन् महान रत्नाला सलाम म्हणून सचिनच्या फलंदाजीचे चित्रिकरण दाखवण्यात आले आहे. आज सचिनच्या या २२ फुटी पुतळ्याचे अनावरण झाले.
दरम्यान, या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शहा आणि खजिनदार आशिष शेलार हे देखील यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, सचिन तेंडुलकर याची ओळख असलेला विशेष फटका मारतानाच्या शैलीतील हा पूर्णाकृती पुतळा आहे. त्याच्या नावाने असलेल्या स्टँडच्या बाजूला हा पुतळा उभारण्यात आलेला असून दिग्गजांच्या उपस्थितीत याचे अनावरण करण्यात आले. हा पुतळा चबुतऱ्यासह एकूण २२ फूट उंचीचा आहे. विजय मर्चंट सँट आणि सचिन तेंडुलकर स्टँडच्या मधोमध हा पुतळा उभारण्यात आला आहे.