Young Sri Lankan Cricketers Gift Virat Kohli Silver Bat : आशिया चषकात १० सप्टेंबर रोजी कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. या बहुचर्चित सामन्याच्या तयारीसाठी विराट कोहलीसह भारतीय खेळाडू नेटमध्ये घाम गाळत आहेत. रविवारच्या सामन्यापूर्वी श्रीलंकेच्या युवा खेळाडूने विराट कोहलीला चांदीची बॅट गिफ्ट म्हणून दिली. किंग कोहलीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे, याचाच प्रत्यय श्रीलंकेत पाहायला मिळाला.
दरम्यान, रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. या मोठ्या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ACC) एक मोठा निर्णय घेतला आहे. पावसाचा व्यत्यय पाहता या सामन्यासाठी राखीव दिवस जोडण्यात आला आहे. त्यामुळे आता पाऊस आल्यास हा सामना राखीव दिवशी अर्थात सोमवारी खेळवला जाईल.
याआधी साखळी फेरीत झालेल्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ भिडले होते. पण, पावसाच्या व्यत्ययामुळे सामना अनिर्णित राहिला अन् दोन्हीही संघांना १-१ गुण देण्यात आला. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे १० सप्टेंबरच्या सामन्याबाबत संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. याच कारणामुळे राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. लक्षणीय बाब म्हणजे १० सप्टेंबरला सामना थांबल्यास ११ तारखेला तिथूनच सामना सुरू केला जाईल.
आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा. (राखीव खेळाडू - संजू सॅमसन)