महिलांची इंडियन प्रीमिअर लीग पुढील वर्षी मार्चमध्ये होणार असल्याचे वृत्त नुकतेच येऊन धडकले आहे. प्रथमच भारतात महिलांची आयपीएल स्पर्धा होणार आहे. आतापर्यंत पुरुषांसाठीच्या आयपीएल स्पर्धेदरम्यान तीन संघांमध्ये महिलांची लीग खेळवण्यात येत होती. पण, आता पुढील वर्षीपासून महिलांची स्वतंत्र आयपीएल स्पर्धा होणार आहे. आयपीएलमुळे भारताच्या पुरुष क्रिकेटपटूंना स्वतःचे कौशल्य दाखवण्याचे हक्काचे मोठे व्यासपीठ मिळालं. त्यामुळे भारतीय संघालाही स्टार युवा खेळाडू सापडले. आता महिलांच्या आयपीएलमुळे भारतीय महिला क्रिकेटमध्ये क्रांती होईल अशी अपेक्षा आहे.
इंग्लंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली रौप्यपदकाची कमाई केली होती. सुवर्णपदकाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. सध्या भारतीय महिला क्रिकेटपटू दी हंड्रेड लीगमध्ये खेळत आहेत. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंसाठी महिला बिग बॅश लीग केव्हाची सुरु झाली आहे आणि त्याचे रिझल्ट ऑस्ट्रेलियाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरीतून पाहायला मिळत आहेत. महिला आयपीएलमुळेही भारतीय महिला क्रिकेटमध्ये तशीच प्रगती पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, दी हंड्रेड लीगमध्ये खेळणाऱ्या स्मृती मानधनाला ( smriti mandhana) पुढल्या वर्षी महिला आयपीएल होतेय, यावर तिचं मत विचारण्यात आलं. त्यावर तिने 'भारी' रिअॅक्शन दिली. ओव्हल इनव्हिसिबल व साउदर्न ब्रेव्ह यांच्यातल्या लढतीत स्मृतीने २५ चेंडूंत ४६ धावांची केळी केली आणि साउदर्न ब्रेव्हने १२ धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर स्मृतीला विचारले गेले की, पुढील वर्षी महिला आयपीएल होणार आहे. त्यातही आम्हाला अशाच प्रकारचा पाठिंबा पाहायला मिळेल का?