मुंबई : दोन दिवसांपूर्वी भारतीय संघाने थरारक झालेल्या ब्रिस्बेन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर मालिकाही जिंकली आहे. भारतीय संघाने कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात ही मालिका जिंकली. या विजयानंतर मायदेशी परतलेल्या भारतीय संघातील खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यात आले.
मुंबईतील घरी परतलेल्या कर्णधार अजिंक्य राहणेचे पुष्पवर्षाव आणि तुतारी वाजवून जंगी स्वागत करण्यात आले. तर पालघरमध्ये शार्दूल ठाकूर याचेही त्याच्या कुटुंबीयांनी जोरदार स्वागत केले. दुसरीकडे, भारतीय संघाचा खेळाडू टी. नटराजन याचेही त्याच्या गावात शाही स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे, टी. नटराजन याचे असे स्वागत करण्यात आले की, त्याच्या या स्वागताचा व्हिडिओ खुद्द विरेंद्र सेहवागने सुद्धा ट्विट करून कौतुक केले आहे.
ज्यावेळी टी. नटराजन त्यांच्या सालेममधील चिन्नप्पापट्टी गावात पोहोचला. त्यावेळी टी. नटराजन याचे जोरदार स्वागत करण्यात आले. गावातील लोकांनी आनंदाने त्याच्या नावाचा जयघोष केला आणि ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढली. यावेळी सर्व चाहते आपल्या मोबाईलवरून टी. नटराजनचे व्हिडिओ बनवत होते. यावेळी, सुरक्षा कर्मचारी म्हणून त्यांच्याबरोबर एक पोलीस तैनात करण्यात आला होता.
रहाणेचे जंगी स्वागतऑस्ट्रेलियाविरोधातील ऐतिहासिक विजयानंतर मायदेशी परतलेला भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेचे मुंबईतील माटुंग्यात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी सोसायटीमधील लोकांनी आणि त्याच्या चाहत्यांनी 'अजिंक्य आला रे आला' अशा घोषणा देत जोरदार स्वागत केले. रहाणेसाठी आणि त्याच्या सोसायटीतील शेजाऱ्यांसाठी हा सुवर्ण क्षण होता.
आता इंग्लंड संघाविरोधात खेळणारभारतीय संघ आता इंग्लंडविरोधात खेळणार आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेपासून होणार आहे. 5 फेब्रुवारीपासून पहिला कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी मालिकेत भारतीय संघाची कामगिरी पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.