प्रत्येक व्यक्तीच्या यशाच्या मागं त्याच्या पालकांच महत्त्वाचं योगदान असतं. आपल्याला जन्म दिलेल्या आई-वडिलांना आयुष्यभर खुश ठेवून त्यांनी केलेल्या उपकाराची परतफेड करावी हा छोटासा प्रयत्न सर्वांचाच असतो. असंच काहीसं भारतीय खेळाडूनं केलं आहे. आपली मुलं जेव्हा यशाच्या शिखरावर पोहोचतात. तेव्हा त्यांच्या पालकांची स्वप्नं आणि इच्छा पूर्ण करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू मंदीप सिंगनं असंच एक स्वप्न पूर्ण केलं, ज्याचा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर शेअर केला आहे.
खरं तर मंदीप सिंगनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मंदीप त्याच्या आईसोबत दुबईत फिरताना दिसत आहे. यादरम्यान त्याच्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा आहे. व्हिडीओ शेअर करताना एक हृदयस्पर्शी मेसेज लिहला आहे.
मंदीप सिंगची स्वप्नपूर्ती "माझ्या आई-वडिलांना सुट्टीच्या दिवशी बाहेर घेऊन जाण्याचं माझं नेहमीच छोटेसं स्वप्न होतं. मी वडिलांना घेऊन जाऊ शकलो नाही, पण शेवटी आईला तिच्या पहिल्या विदेशी सहलीसाठी दुबईला सुट्टीवर घेऊन जाण्यात यशस्वी झालो", असं मंदीपनं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
३१ वर्षीय मंदीपच्या या व्हिडीओवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. त्याचबरोबर भारतीय क्रिकेटपटूंनीही यावर भाष्य करताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. माजी फिरकीपटू हरभजन सिंगने लिहिले, "असं नेहमी करत राहा." उल्लेखनीय बाब म्हणजे मंदीपनं २०१६ साली झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या ट्वेंटी-२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि त्यानं एकूण तीन सामने खेळले आहेत. यादरम्यान त्यानं एका अर्धशतकाच्या मदतीने ८७ धावा कुटल्या आहेत.