भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. स्पर्धेच्या सुरूवातीला संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या शमीला भारतीय संघात स्थान मिळताच त्याने 'पंजा' मारला. दोन सामन्यांमध्ये पाच-पाच आणि एका सामन्यात सात बळी घेऊन शमीने दबदबा निर्माण केला. शमीच्या खेळीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे, तर प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या शमीबद्दल टिप्पणी करून काही मंडळी मजा घेत आहेत. अभिनेत्री पायल घोषने अलीकडेच एक अजब विधान करून चाहत्यांचे लक्ष वेधले होते.
आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या पायल घोषने मोहम्मद शमीला थेट लग्नाची मागणी घातली होती. शमीबरोबर लग्न करण्यासाठी तयार असल्याचे पायलने म्हटले. तिने शमीपुढे लग्नासाठी एक अटही ठेवली. "शमी तुझं इंग्लिश सुधार, मी तुझ्याबरोबर लग्नासाठी तयार आहे", अशी पोस्ट पायलने केली. २ नोव्हेंबरला भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यादरम्यान ही पोस्ट पायलने केली होती.
पायल घोष तिच्या या पोस्टनंतर प्रसिद्धीच्या झोतात आली. अभिनेत्रीच्या या विधानाबद्दल मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँला विचारले असता तिने हे सेलिब्रेटींच्या बाबतीत होतच असल्याचे म्हटले. शमीने न्यूझीलंडविरूद्धच्या उपांत्य सामन्यात सात बळी घेतल्यानंतर हसीन जहाँने आनंद व्यक्त केला. तसेच पायल घोषच्या विधानाबद्दल विचारले असता तिने म्हटले, "हे सर्वकाही सेलिब्रेटींच्या बाबतीत होतच असते... सेलिब्रेटींना नेहमी लग्नासाठी प्रपोजल्स येत असतात." ती 'इंडिया टुडे' या वृत्तवाहिनीशी बोलत होती.
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया किताबासाठी लढतसाखळी फेरीत ऑस्ट्रेलियालाच नमवून भारताने विजयी सलामी दिली होती. भारतीय संघाने विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. आपल्या अखेरच्या सामन्यात नेदरलँड्सविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने ४ गडी गमावून ४१० धावांची विशाल धावसंख्या उभारली. श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांनी शतकी खेळी करून भारताच्या नवव्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अय्यरने नाबाद १२८ धावा केल्या तर राहुलने १०२ धावांचे योगदान दिले. ४११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ २५० धावांत आटोपला. स्कॉट एडवर्ड्सच्या नेतृत्वातील नेदरलँड्सला यंदाच्या विश्वचषकात ९ सामन्यांमध्ये २ विजय मिळवता आले. पण, नेदरलँड्सने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारून क्रिकेट विश्वाला धक्का दिला. त्यांनी आफ्रिकेला ३८ तर बांगलादेशला ८७ धावांनी पराभूत केले.