icc odi world cup 2023 : न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारून भारतीय संघाने फायनलचे तिकिट मिळवले. सलग दहा विजय मिळवून रोहितसेनेने इथपर्यंत मजल मारली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला उपांत्य सामना पार पडला, ज्यात टीम इंडियाने ७० धावांनी मोठा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी सांघिक खेळी करून धावांचा डोंगर उभारला. यामध्ये विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकांचा समावेश होता. पण, धावांचा बचाव करताना सुरूवातीला भारतीय गोलंदाजांना संघर्ष करावा लागला मात्र शमीने सर्वाधिक ७ बळी घेऊन न्यूझीलंडच्या फलंदाजीची कंबर मोडली. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह या त्रिकुटाने भारताच्या गोलंदाजीची धुरा सांभाळली.
भारताने उपांत्य फेरीचा सामना जिंकल्यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने एक भावनिक पोस्ट केली. सिराजने त्याच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना एक बोलका फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर ठेवला. सिराजने ठेवलेल्या फोटोमध्ये पाहायला मिळते की, तो दिवंगत वडिलांच्या आठवणीत भावूक झाल्याचे दिसते. फोन येतानाचा इमोजी असलेला फोटो त्याने स्टोरीवर ठेवला असून 'हा कॉल पाहण्याची माझी इच्छा आहे' असे कॅप्शन दिले आहे.
प्रथम फलंदाजी करताना भारताने ३९७ धावांचा डोंगर उभारला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकांत ४ बाद ३९७ धावा केल्या. ३९८ धावांच्या तगड्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने चांगली सुरूवात केली. पण, मोहम्मद शमी किवी संघासाठी काळ ठरला अन् त्याने सुरूवातीलाच दोन मोठे झटके दिले. त्यानंतर डॅरिल मिचेल आणि केन विल्यमसन यांनी भागीदारी नोंदवून भारतीय चाहत्यांच्या पोटात गोळा आणला. पण, पन्हा एकदा शमी एक्सप्रेसच्या स्विंगने न्यूझीलंडचा संघ चीतपट झाला आणि भारताने ७० धावांनी विजय साकारला.
भारताची फायनलमध्ये धडकन्यूझीलंडला पराभूत करून भारतीय संघाने फायनलचे तिकिट मिळवले आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेता संघ १९ तारखेला भारतासोबत अंतिम सामना खेळेल. मोहम्मद शमीने ५७ धावा देत ७ बळी घेतले अन् संघाला विजय मिळवून दिला.