मुंबई, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : काही वेळा आनंदाच्या भरात खेळाडू अशी काही गोष्ट करून जातात की त्याचा खेळालाही बट्टा लागू शकतो. क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ समजला जातो. त्यामुळे या खेळात असभ्य वर्तनाला कोणताही थारा दिला जात नाही. अशीच एक गोष्ट भारताच्या खेळाडूच्या बाबतीतही घडली. आनंदाच्या भरात भारताच्या एका खेळाडूने मैदानात शिवी हासडली. या गोष्टीची दखल आयसीसीने घेतली असून त्याच्यावर कडक कारवाईही करण्यात आली आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये चौथा सामना मुंबईत खेळवण्यात आला होता. या सामन्यात रोहित शर्माने 162 धावांची तुफानी खेळी साकारली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने 377 धावांचा डोंगर उभारला होता. या खेळीमध्ये रोहितने सर्वाधिक षटकारांच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले होते.
या सामन्यात रोहित सामनावीर झाला असला तरी एका युवा गोलंदाजाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. हा युवा गोलंदाज होता तो खलील अहमद. आपल्या वेगवान माऱ्याच्या जोरावर त्याने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना पळता भूई थोडी केली होती.
काही वेळा युवा खेळाडूंच्या हातूनही काही चुका घडतात आणि हेच खलीलच्या बाबतीतही घडले. खलीलने या सामन्यात वेस्ट इंडिजच्या मार्लोन सॅम्युअल्सला बाद केले. त्यानंतर खलीलने या विकेटचे जोरदार सेलिब्रेशन केले. पण हे सेलिब्रेशन करत असताना त्याने एक शिवी हासडली. त्याचबरोबर मोठ्यामोठ्याने तो बरेच काही बोलत होता. हा त्याचा व्यवहार क्रिकेट या खेळासाठी चांगला नव्हता. खलीलच्या या गोष्टीची दखल आयसीसीने घेतली. सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी सामन्यानंतर खलीलला बोलवून घेतले. जे काही मैदानात घडले आणि ते खेळाला कसे साजेसे नाही, हे खलीलला ब्रॉड यांनी सांगितले. यावेळी खलीलने आपली चुक मान्य केली आहे. आयसीसीने यावेळी 'लेव्हल-1'नुसार खलीलला दोषी ठरवले आहे. त्याचबरोबर त्याला एक डिमेरिट गुणही दिला आहे. ब्रॉड यांनी खलीलला यावेळी ताकिदही दिली आहे. खलील या चुकीमुळे दंडही भरावा लागणार आहे.
आयसीसीने नेमकी काय कारवाई केली ते पाहा