नवी दिल्ली : मॅच फिक्सिंग, स्पॉट फिक्सिंग यासारख्या अनेक भ्रष्टाचारांचे जागतिक क्रिकेटवर कायम संकट राहिले आहे. भारतीय क्रिकेटही अशा गैरवर्तणुकीमुळे अनेकदा डागाळले आहे. मात्र असे प्रकार रोखण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गेल्या काही वर्षांपासून चांगले उपक्रम हाती घेतले असून, त्याद्वारे खेळाडूंना अधिक जागृत केले आहे. त्यामुळेच बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी संस्थेचे (एसीयू) प्रमुख अजित सिंग हेही निश्चिंत असून, त्यांनी भारतीय खेळाडूंवरील आपला विश्वास व्यक्त केला आहे.
‘खेळाडूंना ऑनलाईन ऑफर देण्याच्या प्रकाराबाबत आम्ही चिंतित नाही. कारण कोणत्याही फिक्सिंगच्या प्रकाराची माहिती देण्याबाबत भारतीय खेळाडू चांगल्या प्रकारे सतर्क आहेत,’ असा विश्वास अजित सिंग यांनी व्यक्त केला आहे.
अनुभवी आयपीएस अधिकारी असलेले अजित सिंग यांनी वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितले की,‘आम्ही आमच्या खेळाडूंना चांगल्या प्रकारे समजावले आहे, की लोक त्यांच्याशी कशाप्रकारे संवाद साधतात किंवा कशाप्रकारे आमिष घेऊन येतात. शिवाय सोशल मीडियाद्वारे असे लोक कशाप्रकारे काम करतात, याचीही माहिती त्यांना देण्यात आली आहे. ते आपले चाहते असल्यासारखे वागतील आणि ते कोणत्या तरी ओळखीच्या व्यक्तीद्वारे तुम्हाला भेटण्याचा प्रयत्नही करतील, असेही खेळाडूंना सांगण्यात आले आहे.’ अजित सिंग यांनी पुढे सांगितले की,‘जेव्हा कधी असे प्रसंग घडतात, तेव्हा अनेक भारतीय खेळाडू याबाबतची माहिती आमच्याकडे देतात.’ भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंचे लाखो चाहते असून, हे खेळाडू मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यामुळेच ‘एसीयू’ टीम खेळाडूंच्या आॅनलाईन प्रोफाईलवर लक्ष ठेवून असते का, असाही प्रश्न उपस्थित होतो. यावर अजित सिंग यांनी सांगितले की, ‘सर्वच नाही, पण ज्या खेळाडूंच्या आॅनलाईन हालचालींवर नजर ठेवण्याची गरज भासते, त्यांच्यावर नक्कीच आमची नजर असते. पण सध्या लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक गोष्टीची सत्यता पडताळणे शक्य होत नाही. पण जर कोणत्याही गैरवर्तणुकीचा संशय आला, तर नक्कीच ही हालचाल किंवा संवाद आमच्या डेटाबेसमध्ये आपोआप समाविष्ट होत असतो. त्यामुळे लॉकडाऊननंतर अशा गोष्टींची तपासणी करण्यात अडचण येणार नाही.’ (वृत्तसंस्था)
Web Title: Indian players are above temptation says BCCIs head of ACU Ajit Singh
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.