भारतीय खेळाडूंनी गाजवली विश्वचषक स्पर्धा

संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी छाप पाडली हे तितकेच खरे. यानुसार भारतीय खेळाडूंचे रिपोर्ट कार्ड...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 04:55 AM2019-07-13T04:55:03+5:302019-07-13T11:00:34+5:30

whatsapp join usJoin us
Indian players Gazalee World Cup tournament | भारतीय खेळाडूंनी गाजवली विश्वचषक स्पर्धा

भारतीय खेळाडूंनी गाजवली विश्वचषक स्पर्धा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाझ मेमन

न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या अनपेक्षित पराभवानंतर भारताचे विश्वचषक स्पर्धेतील संपलेले आव्हान निराशाजनक ठरले. पण या आधी विराट कोहलीच्या संघाने स्पर्धेतील सर्वोत्तम संघ म्हणून जबरदस्त खेळ करताना मनोरंजक व थरारक खेळाचा आनंद दिला. रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली हे तिघेही एकत्रित ३ धावा काढून परतल्यानंतर भारताचा डाव कमालीचा घसरला. तरी संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी छाप पाडली हे तितकेच खरे. यानुसार भारतीय खेळाडूंचे रिपोर्ट कार्ड...


रोहित शर्मा ९.५/१०
रोहितने यंदाची विश्वचषक स्पर्धा अक्षरश: गाजवली. स्पर्धेत ५ शतके झळकावल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने ‘एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू’ असा त्याचा गौरव केला. पण दुर्दैवाने त्याला उपांत्य सामन्यात छाप पाडता आली नाही.


शिखर धवन
७.५/१०

धवनही स्पर्धेत चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. विशेषकरून आॅस्टेÑलियाविरुद्ध झळकावलेले शतक अप्रतिम होते. मात्र याच सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर जावे लागले आणि याचा मोठा परिणाम भारतीय संघावरही झाला. त्याच्यासारखा अनुभवी आणि मोठ्या क्षमतेचा फलंदाज गमावणे भारताला महागडे ठरले.


महेंद्रसिंग धोनी
६/१०

फलंदाज म्हणून धोनीसाठी ही स्पर्धा संमिश्र ठरली. इतर फलंदाज सहजपणे खेळत असताना काही वेळा तो अडखळताना दिसला. एक नक्की की ‘फिनिशर’ म्हणून त्याची असलेली सर्वोत्तम ओळख आता भूतकाळ झाली आहे. उपांत्य फेरीतील त्याचा झुंजार खेळ अखेर अपयशी ठरला याचे दु:ख आहे.


दिनेश कार्तिक
१.५/१०

कार्तिकसाठी ही स्पर्धा अत्यंत वाईट ठरली. अंतिम संघात त्याला उशिराने संधी मिळाली खरी, मात्र मिळालेली संधी साधण्यात तो अपयशी ठरला. विशेष करून उपांत्य सामन्यात त्याच्यासारख्या अनुभवी खेळाडूकडून मोठी अपेक्षा असताना आणि वरच्या स्थानावर खेळण्याची संधी मिळाल्यानंतरही तो अपयशी ठरला.


जसप्रीत बुमराह
९.५/१०

स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून बुमराह खेळला, यात वादच नाही. तरी तो स्टार्कएवढे बळी मिळवू शकला नाही किंवा आर्चरप्रमाणे आपल्या संघाला अंतिम फेरीत नेऊ शकला नाही. घातक वेगवान मारा करताना त्याने अप्रतिम यॉर्कर टाकले आणि आपल्या वैविध्यपूर्ण माऱ्याने फलंदाजांना गोंधळून टाकले. तो भारताचा सध्याचा सर्वांत मौल्यवान खेळाडू आहे.


विराट कोहली ७.५/१०
स्पर्धेत एकही शतक झळकावता आले नसले, तरी कोहलीने सुरुवातीपासून आपल्या लौकिकानुसार फलंदाजी केली. उपांत्य सामन्यात बोल्टच्या लेट स्विंगपुढे तो अनपेक्षितपणे गोंधळला. कर्णधार म्हणून त्याने आक्रमक नेतृत्व केले. उपांत्य सामन्यात धोनीला उशिराने पाठविण्याचा त्याचा निर्णय वादग्रस्त ठरला.


मोहम्मद शमी ८/१०
भुवनेश्वर दुखापतग्रस्त झाल्यानंतर शमीने जबरदस्त कामगिरी केली. ४ सामन्यांत त्याने एक हॅट्ट्रिक घेताना १४ बळी घेतले. मात्र डेथ ओव्हर्समध्ये धावांवर नियंत्रण राखण्यात येणाºया अपयशामुळे त्याला संघातील स्थान गमवावे लागले.


हार्दिक पांड्या ७.५/१०
अत्यंत उत्साही खेळाडू असलेल्या हार्दिकने फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक म्हणून चांगल्या प्रकारे लक्ष वेधले. उपांत्य सामन्यात मात्र त्याने खराब फटका खेळून निराशा केली.


भुवनेश्वर कुमार ७.५/१०
मोहम्मद शमीऐवजी भुवनेश्वरला प्रथम पसंती देण्यात आली. त्याने नियंत्रित मारा करताना लेट स्विंग करत फलंदाजांची परीक्षाही घेतली. पण फलंदाजीत अपयशी ठरला.


रवींद्र जडेजा
८.५/१०

जडेजाला स्पर्धेत केवळ दोनच सामने खेळण्याची संधी मिळाली, पण या दोन्ही सामन्यांत त्याने आपली छाप पाडली. अतिशय नियंत्रित गोलंदाजी, चपळ क्षेत्ररक्षण आणि आक्रमक फलंदाजी करत त्याने स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधले.


केदार जाधव २.५ /१०
केदारला खूप कमी संधी मिळाली आपली चमक दाखविण्याची आणि त्यानंतर त्याने अंतिम संघातील आपले स्थानही गमावले. पर्यायी फिरकी गोलंदाज म्हणून त्याला खेळविण्याऐवजी भारताने पाच गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतला.


लोकेश राहुल ७/१०
टीकाकारांची तोंडे गप्प करताना राहुलने चांगल्या धावा काढल्या. पण तरीही दबावाच्या क्षणी तो थोडा गोंधळलेला दिसतो. उपांत्य सामन्यात त्याने विनाकारण बाहेरचा चेंडू खेळण्याचा मोह केला.


रिषभ पंत ६/१०
युवा पंतच्या शानदार गुणवत्तेने सर्वांचे लक्ष वेधले. यामुळेच त्याला क्रिकेटविश्वातील भविष्यातील स्टार म्हणून पाहिले जात आहे. नशिबाने त्याला विश्वचषकाच्या संघात स्थान मिळाले.त्याला परिस्थितीनुसार खेळ करण्याबाबत शिकावे लागेल.


विजय शंकर ५/१०
पाकविरुद्धच्या दमदार अष्टपैलू खेळानंतर दुखापतीने विजयाची विश्वचषक मोहीम संपुष्टात आली. पुढील एकदिवसीय सामन्यांसाठी त्याला संघात नक्कीच स्थान मिळाले पाहिजे.


चहल-यादव ४.५/१०
या जोडीसाठी विश्वचषक स्पर्धा संमिश्र ठरली. काही वेळा दोघांनी मिळून बळी घेतले; पण नंतर प्रतिस्पर्धी फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात जेव्हा अपयश आले तेव्हा दोघांपैकी एकाला संघाबाहेर बसावे लागले. सर्वांत मोठा प्रश्न म्हणजे, प्रतिस्पर्धी फलंदाज आता दोघांची गोलंदाजी सहजपणे समजून घेत आहेत का?

 

Web Title: Indian players Gazalee World Cup tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.