मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या 2019 च्या हंगामासाठी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेला मुहूर्त सापडला आहे. आयपीएलने ट्वें-20 क्रिकेट फॉरमॅटला मोठं केलं. आयपीएलच्या यशामुळे जगभरात अनेक ट्वेंटी-20 व्यावसायिक लीग सुरू झाल्या आहेत. पण, त्यातही आयपीएल आपली लोकप्रियता टिकवून आहे. आयपीएलच्या पुढील हंगामासाठी 18 डिसेंबरला लिलाव प्रक्रिया होणार आहे. जयपूर येथे होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 70 खेळाडूंना ( 50 भारतीय व 20 परदेशी) आपल्या चमूत दाखल करून घेण्यासाठी संघांत चुरस रंगणार आहे.
मात्र, 18 डिसेंबर या तारखेमुळे लिलाव प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीला अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. 18 डिसेंबरला मंगळवार येत असून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे आयपीएलचा लिलाव किती लोकं लाईव्ह पाहतील, याबाबत वाहिनी संभ्रमात आहे. मात्र, आयपीएल लिलाव 18 डिसेंबरलाच होईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी स्पष्ट केले.
किंग्ज इलेव्हन पंजाबने सर्वाधिक 11 खेळाडूंना रिलिज केले आहे, तर गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जने आपल्या 23 खेळाडूंना कायम राखले आहे. त्यांच्याकडे 8.4 कोटी रुपये आहेत. कोलकाला नाईट रायडर्सचा परदेशी खेळाडूला चमूत घेण्याचा प्रयत्न असेल, तर सनरायजर्स हैदराबाद तीन भारतीय आणि दोन परदेशी खेळाडूंसाठी प्रयत्न करणार आहेत.
ऑस्ट्रेलिया व इंग्लंडच्या खेळाडूंना नापसंती?आयपीएल आणि 2019ची आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा यांच्यातील वेळापत्रकात विश्रांतीचा फार कमी कालावधी आहे. त्यामुळे वर्ल्ड कपचे महत्त्व लक्षात ठेवता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये अधिक काळ खेळता येणार नाही. दोन्ही संघांच्या संघटनांनी तशा सूचना केल्या आहेत, त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंना घेण्यासाठी आयपीएल संघांत चुरस रंगेल याची शक्यता कमी आहे.