BCCI announced IPL2022 Date - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाची (Indian Premier League 2022) तारीख अखेर ठरली. आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत ही तारीख ठरवण्यात आली. सुरुवातीला आयपीएल २०२२ ची सुरुवात २७ मार्चपासून होईल अशी चर्चा होती. पण, थेट प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीने आणखी एक तारीख सूचवली आणि त्यावर शिक्कामोर्तब झाले. आता आयपीएल २६ मार्चला सुरू होणार असल्याचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी जाहीर केले. २९ मे ला अंतिम सामना होणार आहे. तुर्तास तरी साखळी फेरीचे सर्व सामने महाराष्ट्रात खेळवण्यात येणार आहेत. प्ले ऑफबाबतचा निर्णय नंतर घेतला जाईल, हेही त्यांनी स्पष्ट केले.
ब्रिजेश पटेल म्हणाले,'२६ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होईल. महाराष्ट्र सरकारच्या कोरोना नियमानुसार आम्ही प्रेक्षकांना परवानगी देणार आहोत. ''
मुंबई इंडियन्ससोबत वानखेडेवर खेळण्यास अन्य फ्रँचायझींचा विरोध!
बीसीसीआयचा हा निर्णय म्हणजे मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) हा एकमेव संघ असेल की जो त्यांच्या घरच्या मैदानावर ४ सामने खेळेल. पण, अन्य फ्रँचायझींनी या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार फ्रँचायझींना मुंबई इंडियन्ससोबत वानखेडे स्टेडियमसोडून अन्य ठिकाणी खेळण्यास काही हरकत नाही. वानखेडे हे त्यांचे होम ग्राऊंड आहे आणि त्यामुळे तो अन्य फ्रँचायझींवर अन्याय ठरेल, असे त्यांचे मत आहे.
''अन्य संघांना घरच्या मैदानावर खेळण्यास मिळणार नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे सामने वानखेडेवर खेळवणे, हा अन्य फ्रँचायझींवर अन्याय असेल. गेली अनेक वर्ष मुंबई इंडियन्स येथे खेळतेय. फ्रँचायझींनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांना मुंबई इंडियन्सविरुद्ध डी वाय पाटील किंवा पुण्यात खेळण्यास काहीच हरकत नाही. ब्रेबॉर्न स्टेडियमही चालले. BCCI या मुद्याचा विचार करेल, अशी आशा आहे,''असे मत फ्रँचायझींच्या सूत्रांनी व्यक्त केले.