(Marathi News) : भारत-अफगाणिस्तान यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. त्यानंतर भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. ही मालिका ११ मार्चला संपतेय आणि बरोबर ११ दिवसांनी म्हणजेच २२ मार्चपासून इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2024) ला सुरुवात होणार आहे. लोकसभा निवडणुका असूनही आयपीएल पूर्णपणे भारतातच खेळवण्याचा निर्धार बीसीसीआयने केला आहे.
अनेक टप्प्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुका आयपीएलसाठी आव्हानात्मक आहेत. पण BCCI स्पर्धा सुरळीत पार पडण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. एखाद्या विशिष्ट शहरासाठी नियोजित सामन्यांशी निवडणुकांचा सामना झाल्यास, ते सामने फक्त पर्यायी ठिकाणी हलवले जातील. जागरण न्यूजनुसार BCCI सचिव जय शाह आणि गृहमंत्री अमित शाह हे ही स्पर्धा भारतात व्हावी यासाठी जवळून सहकार्य करत आहेत. लॉजिस्टिक अडथळे दूर करण्यासाठी भारतीय बोर्डाने संबंधित मंत्रालयांशी आधीच चर्चा केली आहे. सुरक्षा दलांचे योग्य वाटप केले जाईल.
२००९ आणि २०१४ मध्ये आयपीएलला निवडणुकांमुळे भारताबाहेर खेळवली गेली होती. दक्षिण आफ्रिकेने २००९ मध्ये सर्व सामने आयोजित केले होते, तर २०१४ मध्ये विभाजित व्यवस्था पाहिली होती, २० सामने UAE मध्ये आणि उर्वरित भारतात परतले होते. इंडियन प्रीमियर लीग २०२४ (IPL 2024) च्या तारखा, त्याचे ठिकाण आणि वेळापत्रका हे सर्व ECI च्या आगामी घोषणांवर अवलंबून आहे. PTIने दिलेल्या वृत्तानुसार, IPL गव्हर्निंग काऊन्सिल भारतीय निवडणूक आयोगाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखांच्या महत्त्वपूर्ण घोषणेची वाट पाहत आहे. आयपीएल २०२४ नंतर लगेचच वेस्ट इंडिज व अमेरिका येथे १ ते २९ जून या कालावधीत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे.