मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) पुन्हा एकदा दहा संघांमध्ये ठसन पाहायला मिळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) आयपीएलमधील संघ संख्या 8 वरून 10 करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या नव्या दोन संघांसाठी टाटा ( रांची, जमशेदपूर), अदानी ग्रुप ( अहमदबाद) आणि आरपीजी संजीव गोयंका ( पुणे) या कॉर्पोरेट्समध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. बीसीसीआयनं 2010च्या आयपीएलमध्ये 10 संघाचा फॉर्म्युला आजमावला होता. पण, विवादानंतर हा फॉर्म्युला रद्द करण्यात आला.
मागील आठवड्यात आयपीएल फ्रँचायझी मालक आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांमध्ये लंडन येथे एक बैठक झाली. त्यात 2020च्या आयपीएलमध्ये दोन नवीन संघांचा समावेश करण्याचा मुद्दा ठेवण्यात आला आणि 2021मध्ये हे संघ खेळतील. बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनीही बैठक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला, परंतु त्यात काय चर्चा झाली हे त्यांनी सांगितले नाही.अदानी ग्रुपचा 2010 साली अहमदाबाद फ्रँचायझी विकत घेण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. आता पुन्हा एकदा त्यांनी कंबर कसली आहे. अहमदाबाद येथे एक लाख प्रेक्षकक्षमतेचे स्टेडियम बांधून तयार आहे. 2016-17मध्ये पुणे सुपरजायंट्सचे मालक संजीव गोयंकाही पुन्हा आयपीएलमध्ये कमबॅकसाठी प्रयत्नशील आहेत. यांच्याव्यतिरिक्त टाटा समूहीही जमशेजपूरची फ्रँचायझी उतरवण्यासाठी सज्ज आहेत.
शिवाय लखनौ आणि कानपूर याही शहरातून संघ आयपीएलमध्ये खेळण्यास उत्सुक आहेत. 2010च्या आयपीएलमध्ये खेळलेल्या आणि नंतर बरखास्त केलेला कोचि टस्कर्स, केरळ संघही पुनरागमनाच्या तयारीला लागला आहे. आता हा फॉर्म्युला किती यशस्वी होतो हे येणारा काळच सांगेल.