Join us  

सराव सामन्यात भारतीय अध्यक्षीय एकादशने दिला न्यूझीलंडला धक्का

फलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर गोलंदाजांच्या अचूक मा-याच्या जोरावर भारतीय अध्यक्षीय एकादश संघाने पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंड संघाचा 30 धावांनी पराभूत केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 7:58 PM

Open in App

मुंबई - फलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर गोलंदाजांच्या अचूक मा-याच्या जोरावर भारतीय अध्यक्षीय एकादश संघाने पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंड संघाचा ३० धावांनी पराभूत केले. युवा पृथ्वी शॉ, लोकेश राहुल व करुण नायर यांच्या अर्धशतकानंतर जयदेव उनाडकट व शाहबाझ नदीम यांनी प्रत्येकी ३ बळी घेत किवी संघाचे कंबरडे मोडले. भारतीय अध्यक्षीय एकादश संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ९ बाद २९५ धावा उभारल्यानंतर न्यूझीलंडचा डाव ४७.४ षटकात २६५ धावांमध्ये संपुष्टात आणला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून किवींनी यजमानांना प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. आघाडीच्या तीन फलंदाजांनी झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर अध्यक्षीय एकादश संघाने आव्हानात्मक मजल मारली. यानंतर, गोलंदाजांनी नियंत्रित मारा केला. जयदेवने ६२ धावांत ३, तर नदीमने ४१ धावांत ३ बळी घेत किवी संघाला जखडवून ठेवले. या सामन्याद्वारे फिरकी गोलंदाजीचा अभ्यास करण्यासाठी मैदानात उतरलेला न्यूझीलंड संघ नदीमच्या तालावर नाचताना दिसला. तसेच धवल कुलकर्णी, गुरकीरत मान, अवेश खान आणि कर्ण शर्मा यांनीही प्रत्येकी एक बळी मिळवला. टॉम लॅथम (५९) आणि कर्णधार केन विलियम्सन (४७) यांनीच न्यूझीलंडकडून काहीसा प्रतिकार केला. इतर सर्व प्रमुख फलंदाज फारशी चमक न दाखवता परतले. विलियम्सनने ४९ चेंडूत ७ चौकारांसह आपली खेळी सजवली, तर लॅथमने ६३ चेंडूत ७ चौकारांसह अर्धशतक झळकावले. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना अध्यक्षीय एकादश संघाने भक्कम सुरुवात केली. पृथ्वी शॉ आणि राहुल या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात करताना २५.१ षटकात १४७ धावांची शानदार सलामी दिली. ईश सोढीने राहुलला बाद करुन ही जोडी फोडली, तर पुढच्याच षटकात मिशेल सँटनरने पृथ्वीलाही बाद केले. राहुलने ७५ चेंडूत ९ चौकार व एका षटकारासह ६८ धावा केल्या, तर पृथ्वीने ८० चेंडूत ९ चौकार व एका षटकारासह ६६ धावा काढल्या. यानंतर करुण नायरने सर्व सूत्रे आपल्याकडे घेत आक्रमक पवित्रा घेतला. परंतु, त्याला इतर फलंदाजांकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने संघाची धावसंख्या तीनशे पलिकडे गेली नाही. कर्णधार श्रेयस अय्यर (१७), रिषभ पंत (१५), गुरकीरत मान (११) झटपट बाद झाले. परंतु, एका बाजूने टिकून राहिलेल्या करुण नायरने ६४ चेंडूत १२ चौकारांसह ७८ धावांची खेळी करत अध्यक्षीय एकादशला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली.  बोल्टने शानदार मारा करताना ३८ धावांत अर्धा संघ बाद केला. सँटनरने २, तर टिम साऊदी व सोढी यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. संक्षिप्त धावफलक :भारतीय अध्यक्षीय एकादश : ५० षटकात ९ बाद २९५ धावा (करुण नायर ७८, लोकेश राहुल ६८, पृथ्वी शॉ ६६; बोल्ट ५/३८, मिशेल सँटनर २/४०) वि.वि. न्यूझीलंड : ४७.४ षटकात सर्वबाद २६५ धावा (टॉम लॅथम ५९, केन विलियम्सन ४७; शाहबाझ नदीम ३/४१, जयदेव उनाडकट ३/६२)

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघन्यूझीलंड