Indian Skipper Rohit Sharma On India's victory in T20 World Cup 2024 : भारताच्या क्रिकेट संघाने १३ वर्षांच्या ट्रॉफीचा दुष्काळ संपवत शनिवारी ऐतिहासिक कामगिरी केली. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने १३ वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली, तर २००७ नंतर भारताने प्रथमच ट्वेंटी-२० विश्वचषक उंचावला. या विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटला अर्थात ट्वेंटी-२० क्रिकेटला रामराम केले. दक्षिण आफ्रिकेच्या तोंडचा घास पळवून रोहितसेनेने विजय साकारला. जेतेपद पटकावल्यानंतर सर्वच भारतीय खेळाडू भावूक झाल्याचे दिसले.
कर्णधार रोहित शर्माने वृत्तसंस्था ANI शी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तो म्हणाला की, जे जे मला योग्य वाटते ते करण्याचा मी प्रयत्न करतो. जेव्हा मी कर्णधार म्हणून संघाचा भाग झालो तेव्हापासूनच मी या विचारावर चालत आहे. मी भूतकाळ आणि भविष्याबद्दल फारसा विचार करत नाही... मी ट्वेंटी-२० मधून निवृत्ती घेईन असे मला वाटले नव्हते. पण, अचानक अशी एक वेळ आली अन् मला निर्णय घ्यावा लागला. विश्वचषक जिंकून निरोप घेण्यापेक्षा कोणतीही चांगली गोष्ट नाही.
भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल रोहितने सांगितले की, मी २००७ मध्ये या व्यासपीठावर खेळायला सुरुवात केली. आम्ही त्यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर विश्वचषक जिंकला होता. आता इथे पुन्हा एकदा जिंकलो आहोत. याचा आनंद शब्दांत सांगणे कठीण आहे. तीनही फॉरमॅटमध्ये खेळणे हे खूप मोठे आव्हान आहे. आमच्यासाठी आणि खेळाडूंसाठी हे पटकन जुळवून घेणे खूप कठीण आहे. तुम्हाला तांत्रिक बाबी आणि फलंदाजीवर काम करावे लागेल. ट्वेंटी-२० मध्ये तुम्हाला हे करावेच लागते. सुरुवातीपासूनच वेगवेगळे शॉट्स खेळावे लागतात कारण मी सलामीवीर म्हणून डावाची सुरुवात करतो. वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये खेळायलाही मजा येते. मी सर्व फॉरमॅटमध्ये फलंदाजी आणि कर्णधारपदाचा आनंद लुटला आहे.
तसेच धोनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवून टीम इंडियाचे अभिनंदन केले. याचा दाखला देत रोहित म्हणाला की, धोनी हा एक अप्रतिम खेळाडू आहे. त्याने आमच्यासाठी आणि आपल्या देशासाठी खूप काही केले आहे. त्याने आमचे कौतुक केले याचा खूप आनंद वाटतो.