Indian Squad for Asia Cup 2023 : आशिया चषक स्पर्धेसाठी १७ सदस्यीय भारतीय संघाची आज घोषणा केली गेली. निवड समिती प्रमुख अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन खेळाडूंची नावं जाहीर केली. लोकेश राहुल, श्रेयस अय्यर व जसप्रीत बुमराह यांचे वन डे संघात पुनरागमन झाले. तर तिलक वर्मा हा सरप्राईज पॅकेज भारतीय संघात दिसला. युझवेंद्र चहल व आर अश्विन ही दोन नावं नसल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला अन् रोहितने त्यामागचे कारण समजावून सांगितले.
रोहित म्हणाला, ''२०११च्या संघात गोलंदाजी आणि फलंदाजी करणारे खेळाडू होते. यावेळी आम्ही तोच विचार करून संघ निवड केली आहे. पुढे वर्ल्ड कप आहे आणि त्यादृष्टीने खेळाडूंवर काम करायला हवं. एका रात्री गोलंदाजी करणारा खेळाडू घडवू शकत नाही. संघात लवचिकता हवी, परंतु याचा अर्थ असा नाही की ६,७,८ च्या खेळाडूला थेट सलामीला पाठवावे. मी आणि शिखर नेमही सलामीला खेळत आलोय. त्यामुळे मी ओपनिंग करेन आणि विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. या तीन क्रमांकावर बदल करण्याची गरज नाही. संघात नव्याने येणाऱ्या खेळाडूंसाठी ही लवचिकता असावी.''
''ऑफ स्पिनर आणि लेग स्पिनर यांच्याबाबत आम्ही चर्चा केली, परंतु आम्हाला ८व्या आणि ९व्या क्रमांकावर फलंदाजी करेल, असा खेळाडू हवा होता. अक्षर पटेलने या वर्षी फलंदाजीत कमाल करून दाखवली आहे. त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो चांगला खेळतोय. त्याच्यामुळे आम्हाला एक अतिरिक्त डावखुरा फलंदाज मिळाला आहे, जो फिरकीपटूंविरुद्ध चांगली फटकेबाजी करू शकतो. आम्ही आर अश्विन व वॉशिंग्टन सुंदर यांच्याबाबही चर्चा केली. चहलचे नावही चर्चेत आले, परंतु आम्हाला १७ खेळाडू निवडायचे होते, त्यातून यांचे नाव वगळावे लागले. पण, याचा अर्थ असा नाही की त्यांच्यासाठी दरवाजे बंद झालेत,''असेही रोहितने स्पष्ट केले.