मुंबई : भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि भारतातील स्थानिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाज वासीम जाफर लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळानं ( बीसीबी) त्यांच्या अकादमीत फलंदाजांना सल्लागार म्हणून जाफरची निवड केली आहे. जाफर वर्षातून सहा महिने बांगलादेशच्या खेळाडूंना फलंदाजीचे धडे शिकवणार आहे. त्या बांगलादेशच्या 16 आणि 19 वर्षांखालील मुलांना मार्गदर्शन करणार आहे. जाफरच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ संघाने रणजी करंडक स्पर्धेत जेतेपद पटकावले. त्याने 11 सामन्यांत 69.13 च्या सरासरीनं 1037 धावा केल्या होत्या.
''मिरपूर येथील बीसीबीच्या क्रिकेट अकादमीत फंलदाजी सल्लागार म्हणून जाफरची एका वर्षासाठी ( मे ते एप्रिल 2020) नियुक्ती करण्यात येत आहे. तो 16 व 19 वर्षांखालील मुलांना फलंदाजीचे प्रशिक्षण देणार आहे. त्यानंतर त्याची कदाचीत बीसीबीच्या उच्च कामगिरी समितीत फलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती होऊ शकते,''असे बीसीबीच्या कैसार अहमद यांनी सांगितले. जाफरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 253 सामन्यांत 19147 धावा केल्या आहेत आणि रणजी करंडक स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. शिवाय त्याने भारतीय कसोटी संघाचे प्रतिनिधित्व करताना 31 सामन्यांत 34.10च्या सरासरीनं 1934 धावा केल्या आहेत. त्यात पाच शकतं व 11 अर्धशतकांचा समावेश आहे.