भारतीय क्रिकेट संघातील बहुतांश खेळाडू प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. सध्या संघाबाहेर असलेल्या खेळाडूंपासून ते माजी खेळाडू देखील सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते नवनवीन फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. भारतीय शिलेदारांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होतात. पण, टीम इंडियातील खेळाडूंचा एक फोटो असा आहे जो चार वर्षांपासून रहस्य बनून राहिला आहे. २०१९ च्या विश्वचषकातील एक फोटो तेव्हा खूप चर्चेत होता. त्या फोटोत रिषभ पंतच्या खांद्यावर हात टाकणारी व्यक्ती कोण होती? याचं उत्तर अखेर आज मिळालं आहे.
दरम्यान, या फोटोमध्ये हार्दिक पांड्या, महेंद्रसिंग धोनी, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत आणि मयंक अग्रवाल दिसत आहेत. तेव्हापासून हा फोटो व्हायरल होत आहे कारण याच्यात एक रहस्य दडले आहे. या व्हायरल फोटोमध्ये सर्व खेळाडू एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे होते. एक हात रिषभ पंतच्या खांद्यावरही ठेवण्यात आला होता, पण तो हात धोनीचा किंवा बुमराहचा नव्हता. यानंतर पंतच्या खांद्यावर नक्की कोणाचा हात होता, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. या फोटोने अनेक वर्ष चाहत्यांना संभ्रमात ठेवले होते पण आता हे गुपित उघड झाले आहे. या फोटोमध्ये मागे उभ्या असलेल्या मयंक अग्रवालने हे रहस्य उलगडले आहे.
मयंक अग्रवालने सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले, "अनेक वर्षांचे संशोधन, वादविवाद आणि अगणित षडयंत्रांनंतर, देशाला कळले पाहिजे की रिषभ पंतच्या खांद्यावर माझाच हात आहे. कोणतेही आणि इतर सर्व दावे दिशाभूल करणारे आहेत आणि त्यात कोणतेही तथ्य नाही." एकूणच रिषभ पंतच्या खांद्यावर माझाच हात होता असे अग्रवालने स्पष्ट केले.