२०१३ पासून भारतीय संघाला एकही आयसीसीचा किताब जिंकता आलेला नाही. वन डे विश्वचषक २०२३ ची ट्रॉफी उंचावून टीम इंडिया हा दुष्काळ संपवेल अशी आशा होती. मात्र, बलाढ्य ऑस्ट्रेलियाने यजमान भारताचा विजयरथ रोखत विश्वचषक उंचावला अन् तमाम भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. विश्वचषकातील पराभवाची झळ चाहत्यांसह खेळाडूंच्या मनात आजतागायत कायम आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा पाठोपाठ आता लोकेश राहुलने देखील याबाबत भाष्य केले आहे.
यष्टीरक्षक फलंदाज राहुलने सांगितले की, आम्ही जेव्हा निवृत्त होऊ तेव्हा आम्ही केवळ द्विपक्षीय मालिकांसाठी आठवणीत राहायला नको... आमची कारकिर्द सर्वांच्या लक्षात राहावी आणि आम्ही विश्वचषक जिंकला होता यासाठी आम्हाला सर्वांनी आठवले पाहिजे. यासाठी आमचा प्रयत्न आहे की, आगामी काळात आम्ही आमचे विश्वचषक जिंकण्याचे लक्ष्य पूर्ण करू.
यंदा ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार राहुलने स्टार स्पोर्ट्सच्या 'Belive Series' या कार्यक्रमात बोलताना म्हटले, "१० किंवा १५ वर्षांनंतर जेव्हा आम्ही निवृत्त होऊ तेव्हा केवळ द्विपक्षीय मालिकांसाठी आमची आठवण काढायला नको. किंबहुना आम्हालाही फक्त यासाठी आमचे करिअर करायचे नाही. विश्वचषक एकमेव अशी गोष्ट आहे, ज्यासाठी आम्हा सर्वांना आठवणीत ठेवले पाहिजे. आगामी काळात काहीतरी नवीन करण्यासाठी आमच्यामध्ये वेगळी आग आहे." खरं तर आगामी काळात ट्वेंटी-२० विश्वचषक होणार असून, या स्पर्धेचा किताब जिंकण्याचे लक्ष्य टीम इंडियाचे असणार आहे.
भारताची आफ्रिकेत 'कसोटी'भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून तिथे कसोटी मालिका खेळवली जात आहे. ३२ वर्षांत एकदाही भारताला आफ्रिकेच्या धरतीवर विजय मिळवता आला नाही. सलामीच्या सामन्यात देखील याचाच प्रत्यय पाहायला मिळाला अन् भारताचा दारूण पराभव झाला. भारताला आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात एक डाव आणि ३२ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे दुसरा सामना जिंकून मालिका बरोबरीत ठेवण्याचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर आहे.