Ravindra Jadeja, No.1 Ranked ICC Test All Rounder - भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याला आयसीसीने पुन्हा त्याचा मान दिला. मागील आठवड्यात जाहीर करण्यात आलेल्या ICC Test Ranking मध्ये रवींद्र जडेजाने अष्टपैलू खेळाडूंमधील अव्वल स्थान गमावले होते. पण, आजच्या ताज्या क्रमवारीत ते त्याला पुन्हा मिळाले आहे. त्याने ३८५ रेटिंग सह अव्वल स्थान पटकावताना वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर ( ३५७ रेटिंग) याला मागे टाकले. आर अश्विन ३४१ रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे.
रवींद्र जडेजाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अनेक विक्रम केले. एकाच कसोटीत १५०+ धावा व पाच विकेट्स घेणारा तो सहावा खेळाडू ठरला. यापूर्वी विनू मांकड (184 & 5/196) वि. इंग्लंड, १९५२, डेनिस अॅटकिंसन (219 & 5/56) वि. ऑस्ट्रेलिया, १९५५, पॉली उम्रीगर ( 172* & 5/107) वि. वेस्ट इंडिज, १९६२, गॅरी सोबर्स ( 174 & 5/41) वि. इंग्लंड, १९६६ आणि मुश्ताक मोहम्मद ( 201 & 5/49) वि. न्यूझीलंड, १९७३ यांनी हा पराक्रम केला आहे.
भारताकडून एकाच कसोटीत १५०+ धावा व ५ विकेट्स घेणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. विनू मांकड (184 & 5/196) वि. इंग्लंड आणि पॉली उम्रीगर ( 172* & 5/107) वि. वेस्ट इंडिज, १९६२ यांनी हा पराक्रम याआधी केला होता. एकाच कसोटीत ७व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन १५०+ धावा आणि नंतर गोलंदाजीत पाच विकेट्स घेणारा रवींद्र जडेजा हा जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजच्या डेनिस अॅटकिंसन यांनी १९५५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २१९ धावा व ५/५६ अशी कामगिरी केली होती.
फलंदाज व गोलंदाजांची क्रमवारी
भारताचा रोहित शर्मा ( ७५४), विराट कोहली ( ७४२) व रिषभ पंत ( ७३८) हे फलंदाजांच्या क्रमवारीत अनुक्रमे सातव्या, नवव्या व दहाव्या क्रमांकावर कायम आहेत. गोलंदाजी विभागात आर अश्विन ( ८५०) दुसऱ्या, जसप्रीत बुमराह ( ८३०) चौथ्या क्रमांकावर कायम आहेत.
वन डे क्रमवारीत रोहितला फटका
वन डे क्रमवारीत विराट कोहली ८११ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे, परंतु क्विंटन डी कॉकने ( ७९६ रेटिंग) तिसऱ्या क्रमांकावर झेप घेताना रोहित शर्माला ( ७९१ ) चौथ्या क्रमांकावर ढकलले. गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह ( ६७९) सहाव्या क्रमांकावर आहे, तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा ( २२४) संयुक्तपणे १०व्या क्रमांकावर आहे
Web Title: Indian Star Ravindra Jadeja is back as the No.1 Ranked ICC Test All Rounder
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.