भारतीय संघ वन डे विश्वचषकात चमकदार कामगिरी करत आहे. यंदाच्या पर्वातील ३३वा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. रोहितसेनेने आतापर्यंत सर्व सामने जिंकून विजयी 'षटकार' मारण्यात यश मिळवले असून क्रमवारीत अव्वल स्थान गाठले आहे. सलग सातवा विजय मिळवण्याच्या इराद्याने टीम इंडिया गुरूवारी मैदानात उतरेल. आपल्या घरच्या मैदानावर विश्वचषक खेळायला आलेल्या सूर्यकुमार यादवने मरीन ड्राईव्हवर जाऊन अनोळखी म्हणून लोकांशी संवाद साधला.
बीसीसीआयने सूर्यकुमार यादवचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो मरीन ड्राईव्हवर लोकांशी संवाद साधताना दिसत आहे. 'सूर्या'ने मुलाखतीदरम्यान, लोकांना विश्वचषक आणि टीम इंडियाबद्दल काही प्रश्न विचारले. लक्षणीय बाब म्हणजे मास्क परिधान केलेल्या 'सूर्या'ला कोणीच ओळखू शकले नाही. त्याने चेहऱ्यावर मास्क, डोक्यात टोपी आणि चष्मा लावला होता, त्यामुळे अनोळखी 'सूर्या' सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अनोखळी सूर्याला पाहून जडेजा अवाक्मरीन ड्राईव्हवर जाण्यापूर्वी सूर्यकुमार यादवचा अवतार पाहून रवींद्र जडेजा देखील अवाक् झाला. तो देखील भारताच्या मिस्टर ३६० ला ओळखू शकला नाही. यानंतर 'सूर्या'चा आत्मविश्वास वाढला अन् त्याने लोकांशी मनमोकळ्यापणाने संवाद साधला. अखेर त्याने एका चाहत्याला परिचय दिला मग उपस्थित चाहत्यांना भारतीय खेळाडूसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.
दरम्यान, चालू विश्वचषकात सूर्यकुमार यादवला आतापर्यंत दोन सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात तो (२) धावांवर असताना धावबाद झाला पण इंग्लंडविरूद्ध संघ अडचणीत असताना त्याने (४९) धावांची महत्त्वाची खेळी केली. त्यामुळे श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात देखील त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.