Virat Kohli Gifts Jersey To Roelof Van Der Merwe : साखळी फेरीतील सर्व नऊ सामने जिंकून भारतीय संघाने वन डे विश्वचषकातील आपला विजयरथ कायम राखला. रविवारी नेदरलँड्सला नमवून टीम इंडियाने सलग नववा विजय मिळवला. बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात नवख्या नेदरलँड्सला भारताकडून पराभव पत्कारावा लागला. मोठ्या पराभवानंतर नेदरलँड्सचे खेळाडू भावूक झाल्याचे दिसले. पण, भारतीय दिग्गज विराट कोहलीने नेदरलँड्सचा फिरकीपटू वॅन डेर मेरवेला एक खास भेट दिली, ज्याचा व्हिडीओ चाहत्यांच्या मनात घर करत आहे.
दरम्यान, किंग कोहलीने वॅन डेर मेरवेला जर्सी भेट देताच तो भावूक झाला. यानंतर विराटने हस्तांदोलन करत त्याला मिठी मारली. लक्षणीय बाब म्हणजे विराटनेच नेदरलँड्सच्या या खेळाडूला (५१) धावांवर असताना बाद केले होते. भारतीय खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना मार्गदर्शन करताना त्यांच्याशी संवाद साधला. तसेच नेदरलँड्सच्या खेळाडूंनी देखील चाहत्यांचे आभार मानले आणि त्यांच्या पाठिंब्याला दाद दिली.
भारताचा विजयरथ कायमनेदरलँड्सविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने ४ गडी गमावून ४१० धावांची विशाल धावसंख्या उभारली. श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांनी शतकी खेळी करून भारताच्या नवव्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अय्यरने नाबाद १२८ धावा केल्या तर राहुलने १०२ धावांचे योगदान दिले. ४११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ २५० धावांत आटोपला. स्कॉट एडवर्ड्सच्या नेतृत्वातील नेदरलँड्सला यंदाच्या विश्वचषकात ९ सामन्यांमध्ये २ विजय मिळवता आले. पण, नेदरलँड्सने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारून क्रिकेट विश्वाला धक्का दिला. त्यांनी आफ्रिकेला ३८ तर बांगलादेशला ८७ धावांनी पराभूत केले.