deepak chahar ipl | नवी दिल्ली : दीपक चहरसाठी 2022 हे वर्ष खूप वाईट होते. चहर बहुतांश वेळा दुखापतग्रस्त राहिला आणि आयपीएल तसेच भारतीय संघासाठी अनेक मोठ्या स्पर्धांना मुकला. तंदुरुस्त झाल्यानंतर तो भारतीय संघात परतला पण त्याला पुन्हा दुखापत झाली. मात्र, आता चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजाने आयपीएल 2023 साठी सज्ज असल्याचे सांगितले असून त्या दिशेने पावले टाकत असल्याचे म्हटले आहे.
IPL 2022 च्या आधी झालेल्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सनेदीपक चहरला 14 कोटींना विकत घेतले. मात्र, दुखापतीमुळे तो एकही सामना खेळू शकला नाही आणि स्पर्धेतून बाहेर पडला. दीपक चहरच्या गैरहजेरीत सीएसकेच्या संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. पीटीआयशी बोलताना चहरने म्हटले की, तो मागील काही काळापासून त्याच्या फिटनेसवर काम करत असून त्याचे संपूर्ण लक्ष आयपीएल 2023 वर आहे.
दीपक चहर IPLसाठी सज्ज
"मी माझ्या फिटनेसवर मागील दोन-तीन महिन्यांपासून मेहनत घेत आहे, मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि आयपीएलसाठी चांगली तयारी करत आहे. मला दोन मोठ्या जखमा झाल्या. दुखापतीनंतर जो कोणी पुनरागमन करतो त्याला वेळ लागतो, खासकरून वेगवान गोलंदाजांसाठी. जर मी फलंदाज असतो, तर मी बराच काळ खेळलो असतो, पण वेगवान गोलंदाज म्हणून जेव्हा तुम्हाला स्ट्रेस फ्रॅक्चर होते, तेव्हा ट्रॅकवर परत येणे खूप अवघड असते. तुम्ही इतर गोलंदाजांनाही पाठीच्या समस्यांशी झुंजताना पाहू शकता", असे दीपक चहरने पीटीआयशी बोलताना सांगितले.
भारतीय संघात संधी मिळण्याची आशा
दरम्यान, दीपक चहरला मागील वर्षी बांगलादेश दौऱ्यातून भारतीय संघातून वगळण्यात आले होते. मात्र आता त्याला पुन्हा एकदा संघात स्थान मिळेल अशी आशा चहरला देखील आहे. याबाबत बोलताना चहरने म्हटले, "मी माझ्या आयुष्यात एकच नियम पाळला आहे. जर मी माझ्या इच्छेनुसार गोलंदाजी आणि फलंदाजी करत असेल तर मला कोणीही रोखू शकत नाही. हाच नियम होता ज्याने मी माझ्या करिअरला सुरुवात केली. कोण खेळत आहे, कोण खेळत नाही याची मला पर्वा नाही, माझे उद्दिष्ट पूर्णपणे तंदुरुस्त राहून चेंडूवर आणि बॅटने 100 टक्के कामगिरी करणे हे आहे. जर मी हे केले तर मला संघात नक्कीच स्थान मिळेल."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Indian team and Chennai Super Kings fast bowler Deepak Chahar is fit for the upcoming IPL 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.