prasidh krishna ipl 2023 । नवी दिल्ली : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा दुखापतीच्या कारणास्तव आगामी आयपीएल 2023 मधून बाहेर झाला आहे. खरं तर प्रसिद्ध कृष्णा मागील मोठ्या कालावधीपासून क्रिकेटपासून दूर आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात त्याने झिम्बाब्वेविरुद्ध भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. तो जवळपास 6 महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. प्रसिद्ध कृष्णाला गेल्या वर्षी भारत अ संघाकडून खेळताना पाठीला दुखापत झाली होती, त्यानंतर तो संघाबाहेर पडला आणि अद्याप दुखापतीतून सावरत आहे. अलीकडेच त्याने सोशल मीडियावर आपली एक पोस्ट टाकली आणि आगामी क्रिकेटला खूप मिस करणार असल्याची खंत व्यक्त केली.
दरम्यान, प्रसिद्ध कृष्णा यंदाच्या वनडे विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या मुख्य यादीत होता. पण दुखापतीमुळे तो या विश्वचषकालाही मुकण्याची चिन्हे आहेत. पुढील महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या आयपीएलमधून तो बाहेर झाला आहे, त्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. कृष्णा मागील वर्षी रॉयल्ससाठी चांगल्या फॉर्ममध्ये होता आणि त्याने प्रमुख गोलंदाज म्हणून योगदान दिले होते. प्रसिद्ध कृष्णाने आपल्या दुखापतीबद्दल आणि क्रिकेट न खेळण्याबद्दल इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की, "क्रिकेटपासून दूर राहत असल्याचे दुःख आहे, पण लवकरच परत येईन."
प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीची ताकद म्हणजे त्याची उंची, याच्या साहाय्याने तो चेंडूला चांगल्या प्रकारे बाउन्स करतो. त्याने भारतासाठी त्याच्या छोट्या कारकिर्दीत त्याचे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कृष्णा भारतीय संघासाठी केवळ वन डे सामन्यांमध्ये दिसला आहे. त्याने 14 वन डे सामन्यांमध्ये 25 बळी घेतले आहेत, ज्यामध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 4/12 बळी घेतले आहेत, ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"