अमरोहा : भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये शमी किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. मैदानावर प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या नाकीनऊ आणणाऱ्या शमीला मात्र वैयक्तिक आयुष्यात पत्नी हसीन जहांशी झगडावे लागत आहे. हसीन जहांने शमीविरोधात पोलीस ठाण्यातही तक्रार नोंदवली आहे आणि त्यावर कार्यवाही सुरू आहे.
रविवारी हसीन जहां ने थेट शमीच्या घरी म्हणजे तिच्या सासरी जाऊन राडाच घातला. मुलगी आणि तिची आया सोबत हसीन सासरी पोहोचली आणि तिने स्वतःला खोलीत डांबून घेतले. त्यानंतर रंगलेल्या नाट्यामुळे मध्यरात्री पोलिसांना बोलवावे लागले. हसीन सध्या पोलिसांच्या देखरेखीखाली आहे. मानसिक स्वास्थ जाणून घेण्यासाठी तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. यावेळी शमीच्या पत्नीनं पोलीस ठाण्यात पवन कुमार पुत्र इंद्रपाल सिंग आणि अरमान पुत्र मुन्नन यांच्याविरोधात कलम 151 नुसार तक्रार दाखल केली आहे.
हे प्रकरण मध्यरात्री एक वाजता पोलिसांकडे पोहोचले. हसीन जहां मुलगी बेबो आणि तिची आया यांच्यासह सासरी आली. त्यावेळी सासरच्यांनी तिला घराबाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण, हसीन जहांने घरात घुसुन स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले. त्यानंतर सासू आणि दिर यांच्याशी तिचा वाद सुरू झाला आणि शेजारीही त्यांच्या घराजवळ जमू लागले. शमीच्या आईने त्वरीत पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांच्या मदतीने हसीनला खोलीबाहेर काढण्यात आले.
यावेळी हसीन जहांने पोलिसांशीही हुज्जत घातली. हसीन जहांने 2018मध्ये शमीविरोधात न्यायालयात धाव घेतली. तिने शमीवर शारीरिक आणि मानसिक छळाचे आरोप केले.