नवी दिल्ली : फॉर्म आणि फिटनेस राखण्यासाठी डाएट चागलं असावं लागतं. जर चांगलं डाएट मिळालं नाही तर कुणाचंही पोट बिघडू शकतं आणि त्या व्यक्तीला साधारण काम करणंही जमत नाही. सध्याच्या घडीला 'कुलचा' न घेतल्यामुळे भारतीय संघाचं पोट बिघडू शकतं आणि त्यांची विजयाची भूक मंदावू शकते, असे म्हटले जात आहे. भारताचा कर्णधार यावेळी 'कुलचा' जवळ न करण्याचा विचार करत आहे, पण त्यामुळे भारतीय संघाचे नुकसान होऊ शकते, असे म्हटले जात आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये ट्वेन्टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. पण या मालिकेसाठी भारतीय 15 सदस्यीय संघात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना स्थान देण्यात आलेले नाही. या दोघांनी आतापर्यंत बरेच ट्वेन्टी-20 सामने गाजवले आहेत. त्यामुळे त्यांना या मालिकेसाठी संघात का स्थान देण्यात आले नाही, असे प्रश्न बऱ्याच चाहत्यांना पडले आहेत. कुलदीप आणि चहल यांना भारतीय संघात 'कुलचा'असे म्हटले जाते, चाहत्यांनाही हा शब्द परवलीचा झाला आहे.
गेल्या 24 महिन्यांमध्ये कुलदीप आणि चहल यांनी दमदार कामगिरी केली आहे. पण तरीही त्यांना सध्या सुरु असलेल्या मालिकेत संघात स्थान देण्यात आलेले नाही. भारतीय संघ व्यवस्थापन आगामी ट्वेन्टी-20 विश्वचषकासाठी खेळाडूंची चाचपणी करत आहे. पण दुसरीकडे कुलदीप आणि चहल यांना फॉर्मात असतानाही संधी दिली गेली नाही, यामुळे चाहते नाराज आहेत. त्याचबरोबर ट्वेन्टी-20 विश्वचषकासाठी या दोघांची निवड होणार की नाही, हा सर्वांसमोर मोठा प्रश्न आहे.
याबाबत कोहली म्हणाला की, " तुम्हाला एका स्तरावर आल्यावर काही निर्णय घ्यावे लागतात. जेव्हा आम्ही कुलदीप आणि चहल यांना संघात स्थान दिले होते तेव्हादेखील बऱ्याच जणांना हे पटले नव्हते. आमच्यावर टीका झाली होती. जे काही आम्ही निर्णय घेत आहोत ते ट्वेन्टी-20 विश्वचषक डोळ्यापुढे ठेवून घेत आहो. आमचा संघ संतुलित आणि सर्वोत्तम कसा होईल, हे पाहण्याकडे आमचा कल आहे."
कोहली पुढे म्हणाला की, "संघामध्ये काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. या युवा खेळाडूंना संधी देऊन आम्ही त्यांची कामगिरी पाहणार आहोत. आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाडूंची चाचपण करण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत."